– पंचाळा (बु.) येथे माझी माती, माझा देश अभियानाचे आयोजन
नागपूर :- मातृभूमीविषयी कृतज्ञता आणि स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे यासाठी माझी माती, माझा देश अर्थात मेरी माटी, मेरा देश अभियान राबविण्यात येत असून या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज केले.
जिल्हा परिषदेमार्फत रामटेक तालुक्यातील पंचाळा (बु.) येथे ग्रामस्तरावरील माझी माती, माझा देश या अभियानानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ॲड. आशिष जायस्वाल होते. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपवनसंरक्षक डॉ.भारत सिंह हाडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजनंदिनी भागवत, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार हंसा मोहणे, सैन्यदलाचे प्रतिनिधी कर्नल नवीन जोशी, सरपंच प्रगती माटे, उपसरपंच योगेश म्हात्रे, उपविभागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, रामटेक विभागातील पोलिस व महसूल दलाचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्हावे, भविष्याचा वेध घेताना स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचेही स्मरण व्हावे आणि 2047 पर्यंत आपला देश विकसित देश म्हणून नावारुपाला यावा यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे. देशाच्या विकासप्रक्रियेत गावाचे महत्व मोठे आहे. गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. त्यामुळे ग्रामविकासासाठी सर्वांच्या योगदानाची गरज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले. प्रास्ताविकेत त्यांनी जि.प.मार्फत जिल्ह्याभरात राबविण्यात येत असलेल्या माझी माती, माझा देश या अभियानाची माहिती दिली. आमदार ॲड.आशीष जायस्वाल यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करीत सर्वांनी या अभियानासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचप्रण शपथ घेत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी रामटेक उपविभागातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात व पारंपरिक आदिवासी गोंडी नृत्याने मान्यवरांचे कार्यक्रमस्थळी स्वागत केले.
तत्पूर्वी, पंचाळा (बु.) गावातील जि.प. शाळेत शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिजन 2047 संदेश, ग्रामपंचायतीचे नाव ही माहिती नमूद करण्यात आली. त्यानंतर गावातील ग्रामपंचायतीच्या जागेवर वसुधा वंदन उपक्रमांतर्गत देशी रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.