नागपूर :- महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालक पदाची सुत्रे परेश भागवत यांनी आज बुधवार (दि. 25 जुलै) रोजी स्विकारली. भागवत याआधी महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयात मुख्य अभियंता (देयके व महसुल)) या पदावर कार्यरत होते. प्रादेशिक संचालक या पदावर थेट निवड पद्धतीने त्यांची पदोन्नती झाली आहे. त्यांना विद्युत क्षेत्रात 27 वर्षे सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.
नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणी गोंदीया या पाच परिमंडलाचा समावेश आहे. परेश भागवत हे कोल्हापूरचे मुळ रहिवासी आहेत. त्यांनी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथून विद्युत आभियांत्रिकी शाखेत पदवी प्राप्त केली आहे. वित्त व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.
परेश भागवत हे ते 1997 साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले. रत्नागिरी परिमंडळातील कुडाळ विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर ते रुजू झाले. त्यांनी 1999 ते 2006 या कालावधीत कोल्हापूर शहर व ग्रामीण विभागात सेवा बजाविली आहे. ऑगस्ट 2006 मध्ये सरळ सेवेने त्यांची निवड कार्यकारी अभियंता या पदावर झाली. रत्नागिरी परिमंडळात नवनिर्मित खेड विभागाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 2007 ते 2011 पर्यंत ते भिवंडी येथील टोरेंट पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचाईजीत सहाय्यक महाव्यवस्थापक या पदावर ते प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी माहे जानेवारी 2012 ते जुलै 2021 या कालावधीत कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता या पदावर महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयात वितरण, वीज खरेदी, प्रकल्प अशा विविध विभागाची जबाबदारी पार पाडली तर ऑगष्ट 2021 ते जुलै 2024 पर्यंत कोल्हापूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी कार्यरत होते.
ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून महावितरण कार्यरत असून पारदर्शक आणि उच्च दर्जाची सेवा देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे मनोगत भागवत यांनी आपला पदभार स्विकारतांना व्यक्त केला. नवीन तंत्रज्ञानाशी सांगड घालून ग्राहकाभिमुख सेवा देण्यास आपला प्राधान्यक्रम असेल, महावितरणचा डोलारा मोठा आहे, वीजेची वाढती मागणी त्यात वीज उत्पादकांना नियमित द्यावा लागणारा पैसा लागतो त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनीही नियमित वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही भागवत यांनी केले. याप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंते मंगेश वैद्य, संजय वाकडे, महाव्यवस्थापक (वित्त) अतुल ठाकरे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) प्रंजली कोलारकर, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांचेसह अनेक अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.