पालकांनी मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूक असावे – अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल

– शाळा व्यवस्थापन समिती व पालक मेळावा

नागपूर :- मुलांच्या सर्वांगिण विकासाचे केंद्र शाळा आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच इतर क्षेत्राचेही ज्ञान देउन त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न होतो. या मौलीक कार्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूक रहावे, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.

नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या नवचेतना उपक्रमाअंतर्गत बुधवारी (ता.२१) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘शाळा व्यवस्थापन समिती व पालक मेळावा’चे आयोजन करण्यात आले. यावेळी आंचल गोयल बोलत होत्या. मंचावर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, बाल कल्याण विभागाचे मुश्ताक पठाण, मनपा बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना जयस्वाल, मनपा शिक्षणाधिकारी साधना सयाम, सहायक कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार, आकांक्षा फाउंडेशनच्या जयश्री ओबेरॉय, मनपा शाळेचे माजी विद्यार्थी झाकीर हुसेन, आयएपीएच्या अमरजा खेडीकर यांच्यासह इतर पालक, शिक्षक, विद्यार्थी व मनपा कर्मचारी उपस्थित होते. 

मनपा शाळेतील शाळा समिती सदस्य व पालकांना शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहिती, मनपा शाळेचे अमूल्य कार्य, मनपातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना तसेच शालेय विद्यार्थांना दिले जाणारे शालेय साहित्य, शिक्षणाचे महत्व, पालकांची त्यांच्या पाल्याविषयीची जागरूकता व पालकांचा शालेय कार्यकलपात सहभाग या सर्व विषयांवर अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मार्गदर्शन केले.

मनपाच्या प्रत्येक शाळेत सुपर-75, ‘माझी शाळा सुंदर शाळा’ असे उपक्रम शाळेचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी घेतले जातात. शिक्षकांनी येणाऱ्या नवीन सत्रात दर महिन्यात एक पालकसभा घ्यावी जेणेकरून शिक्षक आणि पालक यांच्यात एक नाते प्रस्थापित होईल व मुलांच्या प्रगतीविषयी देखील माहिती मिळेल, असे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी शिक्षण विभागाला दिले. यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, पालकांनी त्यांच्या पाल्याविषयी जागरूक राहावे. तसेच शाळेत जाऊन शिक्षकांना पाल्याच्या प्रगतीविषयी विचारणा करावी व आपल्या मुलामुलींना नीट समजून घ्यावे, असे त्या म्हणाल्या.

नवीन शैक्षणिक धोरणात मनपा शाळेच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या अंगणवाड्यांना मनपा शाळेत जागा देण्यात येणार असून मनपा शाळेत बालवाडी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नवचेतना उपक्रमाअंतर्गत मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळेच्या विकासासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वेक्षण करण्यात आले व त्यात आढळलेल्या त्रुटींचे एक रिपोर्टकार्ड बनविण्यात आले असून ते मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीला द्यावे, असे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मुख्याध्यापकांना दिले. या त्रुटी भरून काढण्यासाठी व शाळा अत्याधुनिक बनविण्यासाठी मनपा सतत प्रयत्नशील आहे. येणाऱ्या शैक्षणिक सत्रात मनपा शाळेच्या भौतिक विकासात चांगलीच प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून दिले. सकाळी लवकर उठण्याचे फायदे, किशोरावस्थेतील लसीकरण आदींची माहिती दिली. लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने होणारे दुष्परिणाम देखील त्यांनी उदाहरणासह विषद केले. शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी शाळेत घेण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती, मनपाकडून विद्यार्थांना मिळणारे शालेय साहित्य, पोषण आहार याविषयी माहिती दिली. मनपा बाल रोग तज्ज्ञ डॉ. अर्चना जयस्वाल यांनी दैनंदिन जीवनात मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावणे, त्यांना पोषक आहार देण्याचे आवाहन केले. मनपा शाळेचे माजी विद्यार्थी झाकीर हुसेन यांनी स्वतःचे शालेय अनुभव सांगितले. झाकीर हुसेन हे एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून मिळविलेले यश याबाबत माहिती दिली. आयएपीएच्या अमरजा खेडीकर यांनी पॉक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. यात त्यांनी ‘गुड टच’, ‘बॅड टच’, मुलांचे अधिकार व कायदे समजावून सांगितले. सहायक कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार यांनी मनपा शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य सर्वांसमोर मांडले.

जी. एम. बनातवाला शाळेची विद्यार्थिनी इफ्रा हिने इंग्रजी भाषेत मनपा कार्याविषयी उत्तम माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन मनपा शाळेची विद्यार्थी श्वेता हिने केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरकुल योजनांच्या कामांना गती द्यावी - मंत्री अतुल सावे

Thu Feb 22 , 2024
मुंबई :- प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी राज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येतात. मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अहिल्याबाई होळकर धनगर वस्ती योजना या योजनेतून अधिकाधिक नागरिकांना घरकुल मिळाली पाहिजेत. यासाठी या योजनेअंतर्गत करण्यात येणारी घरकुलांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. मंत्रालयात मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com