ऑक्सिजन पार्क पर्यावरण संवर्धनासह पर्यटनासाठीही उपयुक्त – ना. गडकरी

– ‘ऑक्सिजन बर्ड पार्क’चे थाटात लोकार्पण

नागपूर :- पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. आपण सारे ध्वनी, वायू, जल प्रदूषणाचा सामना करीत आहोत. प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होत आहे. अशात पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रत्येकात निर्माण होणे आवश्यक आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘ऑक्सीजन बर्ड पार्क’ हे उत्तम माध्यम ठरणार आहे. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा उद्देश साध्य होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केला.

ना. गडकरी यांच्या संकल्पनेतून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) जामठा परिसरात ऑक्सिजन बर्ड पार्क साकारला आहे. या उद्यानाचे लोकार्पण ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. येथील नैसर्गिक तलावाच्या शेजारी ना. गडकरी व इतर पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ना. गडकरी यांनी आईच्या नावाने वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाला रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार विकास कुंभारे, आमदार आशीष जयस्वाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, एनएचएआयचे सचिव अनुराग जैन, अध्यक्ष संतोष यादव, सल्लागार अशोक जैन, प्रादेशिक अधिकारी आर.पी. सिंग, प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आर्किटेक्ट हबीब खान, पर्यावरण संवर्धन सल्लागार दिलीप चिंचमलातपुरे, कंत्राटदार शरद मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.

ना. गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘एक वृक्ष माँ के नाम’ या अभियानाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक वृक्ष माँ के नाम’ हे अभियान घोषित केले. यामध्ये सर्वांनी सहभाग घेण्याची गरज आहे. देश प्रदूषणमुक्त करणे हा यामागचा अजेंडा आहे. याच धरतीवर एनएचआयने २०१५ मध्ये हरित महामार्गांचे धोरण आणले. गेल्या दहा वर्षांत आम्ही ४ कोटी झाडे लावली. ७ लाख झाडांचे ट्रान्सप्लान्टेशन केले. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास ५०० तलाव एनएचआयने बांधले. ऑक्सीजन बर्ड पार्क हा देखील हरित संकल्पाचाच एक भाग आहे.’

‘बर्ड पार्क’मधील नैसर्गिक तलावात सध्या बदक आणि इतर पक्षी आहेत. परंतु फळझाडांची लागवड केल्याने अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा येथे येतील. याठिकाणी खास पक्ष्यांसाठी फळझाडे लावण्यात आली आहेत. येथील फळे पर्यटकांसाठी नसून ती केवळ पक्ष्यांनाच खाता येणार आहेत, याचाही ना.गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशीष जयस्वाल यांनी, ‘ना. गडकरी हे व्हिजन असलेले नेते आहेत आणि त्यांच्यामुळे नागपूरची देशात वेगळी ओळख निर्माण होत आहे’, असे मत व्यक्त केले.

आम्ही संवर्धन करतो

एक झाड कापणे हे एका माणसाची हत्या करण्यासारखे आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीसह ट्रान्सप्लान्टेशनवर आमचा भर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे रस्ते निर्मिती सोबतच अनेक पर्यावरण संवर्धनाची कामे केली जात आहेत. वणी-वरोरा या रस्त्यावर बांबूच्या पर्यावरण पूरक क्रॅश बॅरियरची बांधणी, उड्डाणपुलाच्या बांधकामांमध्ये स्टील ऐवजी ग्लास फायबरचा वापर, रस्ते निर्मितीमध्ये म्युनिसिपल वेस्टचा वापर, रस्ते निर्मितीसाठी तलाव खोलीकरणातून मिळणाऱ्या मातीचा वापर केला जात आहे. आम्ही पर्यावरण खराब करणारे नव्हे तर पर्यावरणाचे संवर्धन करणारे आहोत, हेच आम्हाला सांगायचे आहे, असेही ना.गडकरी म्हणाले.

असा आहे बर्ड पार्क

जामठा क्लोव्हर लीफ येथे नागपूर-हैदराबाद (NH-44) सेक्शनवर जवळपास २० एकर जागेत ऑक्सिजन बर्ड पार्क विकसित करण्यात आला आहे. १४.३२ कोटी रुपयांमध्ये या प्रकल्प नावारुपाला आला आहे. हरित विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन (प्राणवायू) देणारा परिसर एवढेच नसून पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी एक आश्रयस्थान म्हणून ते उपयुक्त ठरेल. 8,104 प्रकारच्या वनस्पतींसह 11 हेक्टर क्षेत्रफळावर ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात नैसर्गिक तळ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. या उद्यानात फूड कोर्ट, प्रसाधनगृहे, चालण्याचे मार्ग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, वॉचटॉवर, ॲम्फीथिएटर प्लॅटफॉर्म आणि मुलांसाठी विशेष क्रीडा क्षेत्र यासह विविध प्रकारच्या सुविधा आहेत. प्रवेशद्वारावर आकर्षक आर्किटेक्चरल डिझाईनचे आहे. विशेष म्हणजे हे उद्यान विविध प्रकारची फळे देणाऱ्या वनस्पतींनी समृद्ध आहे. जांभळे, आंबा, पेरू, बेल, चिंच, अंजीर, खिरणी, पिंपळ, सीताफळ, आवळा ही झाडे फक्त पक्ष्यांसाठी संरक्षित आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘महाराष्ट्र विधानसभा - २०२४ विजय संकल्प संमेलन' मुंबईत सोमवारी

Sun Sep 29 , 2024
– उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर :- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी ३० सप्टेंबर २०२४ रोजी ‘महाराष्ट्र विधानसभा – २०२४ विजय संकल्प संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील दादर मधील वसंत स्मृती येथे सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!