-ओमिक्रॉनपासून सुरक्षेसंदर्भात व्यवस्थेचा घेतला आढावा : चाचणी न करणा-यांवर साथ रोग प्रतिबंधक नियमांतर्गत कारवाई होणार
नागपूर : देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ नये यासाठी कठोर पावले उचलली आहेत. विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणा-या नागरिकांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे, यासंबंधी स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्यापासून सुरक्षेसंदर्भात मनपातर्फे करण्यात आलेल्या आरोग्य सुविधेचा मनपा आयुक्तांनी सोमवारी (ता.२७) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता प्रदीप खवले, उपायुक्त मिलिंद मेश्राम, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. गोवर्धन नवखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुल्हाने, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी डॉ. कृष्णा, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ . विजय जोशी, डॉ. शुभम मनगटे आदी उपस्थित होते.
मनपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. सध्या नागपुरात एअर अरेबिया हे विमान येत आहे. या विमानातून आलेले प्रवाशी कोरोनाबाधित निघाले आहे. त्यामुळे आता सर्व विदेशी प्रवाशांची चाचणी विमानतळावरच करा, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ज्या प्रवाशांचा कोरोना अहवाल सकारात्मक येईल त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविण्यात यावे, अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. प्रवाशांच्या संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था मनपा तर्फे सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवास येथे करण्यात आली आहे. तसेच ज्यांना हॉटेल मध्ये राहायचं असेल त्यांना हॉटेल अल-झम-झम आणि हॉटेल ओरिएंटल येथे स्वखर्चाने विलगीकरणात राहता येणार आहे.
विदेशी प्रवाशांनी स्वतःहून कोरोना चाचणीसाठी पुढे यावे असे आवाहन करतानाच मनपा आयुक्तांनी जे प्रवाशी स्वतःहून कोरोना चाचणीसाठी पुढे येणार नाही त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक नियमांतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. ज्यांचे एस जीन रिपोर्ट फेल झाले आहे अश्या (ओमिक्रॉन संशयित) रुग्णांना रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत नागपुरात कोरोनाचे एकूण ९१ सक्रिय रुग्ण असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. शहरात रुग्णसंख्या वाढली तर कंटेन्टमेंट झोन तयार करण्याचे संकेतही यावेळी आयुक्तांनी दिले. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी सुद्धा चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले.
यावेळी मनपा आयुक्तांनी मृत कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानाची माहिती घेतली. नागपूर शहरात सद्यस्थिती ३७०० प्रकरणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आलेली आहेत. आतापर्यंत १७०० प्रकरणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे मंजूर करण्यात आली आहे.
शाळा-कॉलेजमध्ये १५-१८ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करा
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने लसीकरणाच्या तयारीबाबत मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. १५ ते १८ वर्ष वयोगटात इयत्ता दहावी ते बारावी पर्यंतचे येतात. नागपूर शहरात या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास १ लाख पर्यंत आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरे घेण्याचे निर्देश यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. यासाठी कोचिंग क्लासच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करा, असेही ते म्हणाले. शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांना शाळेचे आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राध्यापकांसोबत चर्चा करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाट लक्षात घेता डॉक्टर्स, नर्सेस, आणि अन्य स्टाफ तयार ठेवण्याच्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
कोरोनापासून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी दुसऱ्या डोजसाठी पात्र नागिरकांनी वेळेत आपला दुसरा डोज घेण्याचे आवाहनही यावेळी आयुक्तांनी केले.