आपली बसच्या वाहकांना मिळणार किमान वेतन कायद्यानुसार पगार

– नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघाच्या मागणीवर आयुक्तांचा निर्णय

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ परिवहन सेवेतील वाहकांचे वेतन आता किमान वेतन कायद्यानुसार होणार आहेत. यासंदर्भात नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघाद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या मागणीनुसार किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करुन वेतन देण्याबाबत ‘चलो मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ला आदेश देण्यात येणार असल्याबाबत यावेळी आयुक्तांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केले.

नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नागेश सहारे, महासचिव कमलेश वानखेडे, सुमित चिमोटे, निलेश पौनीकर, विक्की चौधरी, प्रवीण नरवणे, संदेश डोंगरे, प्रवीण काटोले, सचिन वसू, अश्विन दोनाडकर, सागर मडके यांनी शुक्रवारी (१० जानेवारी) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेतली व आपली बसच्या वाहकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार वेतन देण्याची विनंती केली.

१० ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी व आपली बस मधील कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबद्दल अधिसूचना लागू केली होती. या अधिसूचनेनुसार ‘आपली बस’च्या चालक आणि वाहकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे आवश्यक आहे. मात्र असे असूनही नागपूर महानगरपालिकेतील ‘आपली बस’च्या चालक व वाहकांच्या वेतनामध्ये वाढ झालेली नाही. अधिसूचना जारी होऊन तीन महिन्यानंतरही मनपाद्वारे अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघाद्वारे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी चालकांच्या वेतनाच्या संदर्भात कायदेशीर अभिप्राय (लिगल ओपिनियन) मागविण्यात आले असून त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र वाहकांच्या वेतनासंदर्भात त्यांनी सकारात्मकता दर्शवित शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करुन किमान वेतन कायद्यानुसार वाहकांचे वेतन करण्याचे आदेश ‘चलो मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ला देत असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.

मनपा आयुक्तांच्या या निर्णयाचे नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघाद्वारे स्वागत करण्यात आले. त्यांनी या विषयाकरिता सातत्याने पुढाकार घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल आमदार प्रवीण दटके यांचे आभार मानले. कंत्राटी कामगार आणि आपली बसचे वाहक व चालकांच्या वेतनाच्या अनुषंगाने दटके यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले व मागील अनेक वर्ष संघर्ष दिला. त्यांचा पुढाकार आणि सततचा पाठपुरावा यामुळे आजचा आनंदाचा दिवस आल्याचे संघटनेचे अध्यक्ष नागेश सहारे यांनी सांगितले.

आमदार प्रवीण दटके यांनी दिले मुख्यमंत्र्यांना धन्यवाद

मनपा आयुक्तांच्या निर्णयावर आमदार प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले. कंत्राटी कामगार व आपली बसचे चालक, वाहक यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळावे याकरिता मागील १६ वर्षापासून संघर्ष सुरु होता. देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यामुळे शासन अधिसूचना जारी झाली. आज या अधिसूचनेची नागपूर महानगरपालिकेद्वारे अंमलबजावणी होणे ही स्वागतार्ह बाब आहे. वाहकांसोबतच चालकांच्या वेतनाचा प्रश्न लवकर सुटावा यासाठी आयुक्तांनी कायदेशीर प्रक्रिया येत्या महिनाभरात पूर्ण करावी. नागपूर शहरातील जनतेला वेठेशी ठेवण्याचा संघटनेचा मुळीच हेतू नाही पण येत्या महिनाभरात चालकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास नाईलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आमदार प्रवीण दटके यांनी दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विमानतळ परिसरात पक्षी, पाळीव प्राणी यांच्यावर तत्काळ निर्बंध लावा - विभागीय आयुक्त

Fri Jan 10 , 2025
–  विमानतळ सुरक्षा परिसर संरक्षणाचा आढावा – कचरा संकलन व विल्हेवाट नियोजन –  मासविक्री केंद्राबंदमुळे अडथळा येणार नाही दक्षता घ्या नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुमारे दहा किलोमिटर परिसरात पाळीव प्राणी, पक्षी आदीमुळे विमानांना अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतांनाच परिसरातील स्वच्छता व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या. विभागीय आयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!