नागपूर : रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन अपघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 12 जानेवारीला प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व वाहन चालक यांच्याकरिता रस्ता सुरक्षा विषयी – जसे की हेल्मेट, सीटबेल्ट,ओवरस्पीडिंग, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे व अपघात समयी मदत करणे आदी विषयांवर प्रबोधन व चर्चा करण्यात आली तसेच उपस्थितांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले. याप्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूरचे मोटर वाहन निरीक्षक अमित कराड, रवींद्र राठोड, मंजुषा भोसले व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ध्वज दखने तसेच डॉ. शशिकांत शंभरकर, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा व सुषमा बाणिक, मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर मंडळ हे उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस ना रिफ्लेक्टिव टेप लावण्यात आले, त्याचबरोबर वाहनचालक व वाहक यांना रस्ता सुरक्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले, त्याचबरोबर बसेस मधून जाणाऱ्या शालेय मला मुलींना रस्ता सुरक्षाबाबत प्रबोधन करण्यात आले.
नेत्रतपासणी
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) येथे रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नेत्र तपासणी शिबीरची सुरुवात करण्यात आली.यावेळी सरक व फासे उपस्थित होते. या शिबिराचा लाभ कार्यालयात सीएफआरएसाठी आलेल्या वाहन चालकांनी तसेच शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आलेल्या उमेदवारांनी घेतला.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर( पूर्व) येथे रास्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.व्हिजन एक्स्प्रेस यांच्या माध्यमातून कार्यालयात अनुज्ञप्ती साठी येणाऱ्या उमेदवारांचे तसेच वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या चालकांचे नेत्र तपासणी केली जात आहे.
रस्ता सुरक्षा प्रबोधन शिबिर
रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत आज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर व महाराष्ट्र इंजिनिअरिंग कंपनी, एन.सी.सी., नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी मोटर वाहन निरीक्षक अमित कराड, रवींद्र राठोड, मंजुषा भोसले उपस्थित होते. या कार्यक्रमास कर्नल पी.ई.सागरलाल व सुभेदार दिलीप नगरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर यांचेमार्फत मोरभवन, एस.टी. बस स्टँड येथे रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर यांचेमार्फत इमामवाडा, एस.टी. बस डेपो येथे रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी मोटर वाहन निरीक्षक कराड, राठोड, मंजुषा भोसले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विप्लव तिवारी तसेच सुधीर पवार वाहतुक निरीक्षक तसेच सिटीबस नियंत्रक व वाहनचालक उपस्थित होते.