नागपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे 16 मार्च रोजी सती अनुसया माता मंदीर, पारडसिंगा, तालुका काटोल येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या महामेळाव्यात नागपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध विधी सेवा व शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देवून पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे.
शासकीय योजनांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना, शासनाच्या विशेष अर्थ सहाय्य, आवास, आरोग्य, कृशी, महिला व बाल विकास, रोजगार/स्वयंरोजगार, कामगार, परिवहन, अन्न व नागरी पुरवठा, महामंडळे, इत्यादी विभागांच्या योजनांचा समावेष आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.
याचबरोबर नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्याय संहिता 2023 या विषयावर मल्टी मिडीया छायाचित्र प्रदर्शन करण्यात येणार आहे. काटोल तालुका व परिसरातील सर्व नागरिकांनी रविवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 9.00 वाजता श्री. सती अनुसया माता मंदीर, पारडसिंगा, तालुका काटोल, जिल्हा नागपूर येथे आयोजित या विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचे महामेळाव्यास भेट द्यावी. यातील विधी सेवा व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन स. पाटील यांनी केले आहे.
हा महामेळावा उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती नागपूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर, जिल्हा प्रशासन, नागपूर व तालुका विधी सेवा समिती, काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.