“पर्यावरण संतुलित विकासासाठी युवकांचा सहभाग आवश्यक”: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई :-पर्यावरण संतुलित विकास ही काळाची गरज आहे. केवळ आर्थिक व भौतिक प्रगतीतुन विकास साधणार नाही, तर त्या करिता शाश्वत जीवनमुल्यांवर आधारित प्रगती करावी लागेल. पर्यावरण संतुलित विकासासाठी युवकांचा सहभाग विशेषत्वाने आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबईच्या शाश्वत विकासासाठी संकल्पना व कृती योजना’ या विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. १२) मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशन या संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, जैन आचार्य लोकेश, संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेश सर्वज्ञ, गोपाल आर्य, राजशेखर जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वती यांनी देखील कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवल्या.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन करुन देशाच्या उज्वल भवितव्यासाठी युवकांना देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती करुन देणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारत हा वर्षांनुवर्षे गुलामगिरीत असलेला देश होता असा चुकीचा इतिहास समाजमनावर बिंबविण्यात आला असल्याचे नमूद करून स्वामी विवेकानंद यांनी युवकांना प्रथमच देशाच्या गौरवशाली वारस्याची जाणिव करुन दिली, असे राज्यपालांनी सांगितले. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी त्यागी व समर्पित युवकांची गरज असल्याचे सांगताना युवकांनी विवेकानंदांचे जीवन कार्य अवश्य अभ्यासावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.
मुंबईच्या पर्यावरण सुसंगत विकासासाठी शासनाने इलेक्ट्रिसिटी वाहनांना चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे, असे सांगून देशाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते प्रियदर्शनी अकादमीचे संस्थापक नानिक रुपानी यांना पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अहिंसा विश्वभारतीचे आचार्य लोकेश, ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, सद्गुरु योगीराज मंगेशदा, ‘स्वयम’ पुनर्वसन ट्रस्टच्या नीता देवळालकर, विल्सन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ ऍना प्रतिमा निकाळजे, सौम्या सूर्यनारायणन, शांतीलाल गुलेचा, ऋषी अगरवाल, वैष्णव शेट्टी आदींना शाश्वत कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.