नागपूर :- श्रध्दानंदपेठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आज सकाळी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सुरेंद्र पवार, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागातून आलेले ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.
सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र व परिसंवाद आदी कार्यक्रमाचे आयोजन दिवसभर आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शनसुध्दा यावेळी करण्यात आले.