– स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे पुरस्कार जाहीर होणार
नागपूर :- कचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेसाठी युवकांसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, या हेतूने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “इंडियन स्वच्छता लीग सीजन २ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्यावतीने येत्या रविवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता “प्लॉग रन व रॅली” चे आयोजन करण्यात आले आहे. या शहर स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवीत आपल्या नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. या कार्यक्रमात नागपूर महानरपालिकाद्वारा नागपूर@२०२५ संस्थेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. या रॅली मध्ये ग्रीन व्हिजिल संस्था, नागपूर @२०२५ आणि इतर संस्थांचा सहभाग आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व शहरांमध्ये १७ सप्टेंबर रोजी इंडियन स्वच्छता लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
रविवार(ता. १७) रोजी महाल टाऊन हॉल ते चिटणिस पार्क दरम्यान प्लॉग रन व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्लॉग रन व रॅली ही सकाळी ७ वाजता टाऊन हॉल येथून निघेल. याठिकाणी नागरिकांकरिता ई- कचरा संकलन केंद्र, वृत्तपत्र संकलन केंद्र, प्लास्टिक वेस्ट संकलन केंद्र, जुने कपडे संकलन केंद्र, जुने पुस्तक संकलन केंद्र(E-Waste, Plastic Waste, News Paper) तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर प्लॉग रन व रॅली बडकस चौक होत लाकडीपूल, दारोडकर चौक, चितार ओळी चौक ते बडकस चौक होत चिटणीस पार्क येथे पोहचेल, याठिकाणी ढोलताशांच्या गजरात स्वच्छतेचा संदेश देण्यात येईल. चिटणीस पार्क येथे समारोपीय कार्यक्रम होईल. “इंडियन स्वच्छता लीग सीजन २” या स्पर्धेकरिता ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून नावलौकिक असणाऱ्या नागपूर शहराच्या संघाला “नागपूर टायगर्स” असे नाव देण्यात आले आहे. “नागपूर टायगर्स” या संघाच्या कर्णधारपदी सुरभी जयस्वाल यांची निवड करण्यात आली असून, शहराचे स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे माजी कर्णधार गुरदास राउत, उमेश चित्रीव यामध्ये असणार आहेत. या शहर स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी, सेवाभावी संस्थांनी, तरुणांनी, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवीत आपल्या नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ बनवावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.