नागपूर :- महावितरणच्या नागपूर परिमंडलातर्फ़े मृत किंवा वैद्यकीय कारणास्तव मुदतपुर्व सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी अनुकंपा तत्वावर नियुक्ती किंवा अंतिम देयकाबाबत समुपदेशन-सल्ला शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वारसांना त्यांचे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर मिळणाऱ्या विविध लाभांची, त्यांची नौकरीकरीता असलेल्या निश्चित जेष्ठता क्रमांकाबाबत माहिती देण्यात आली.
नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या अध्यक्षतेत झालेया या समुपदेशन कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी, महावितरण सदैव एक कुटुंब म्हणून दिवंगत कर्मचा-यांच्या वारसांचा पाठीशी असून त्यांच्या कार्यालयीन अडचणी दूर करण्याबाबत सदैव तत्पर आहेत, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांसोबत सदैव असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम राबविण्यात आला असून यावेळी त्यांनी वर्तमानात वारस धारण करीत असलेल्या शैक्षणिक अहर्तेत शक्य झाल्यास योग्य शिक्षणाची अधिक जोड देऊन ते स्वतःचा व भविष्यात महावितरण कंपनीचा उत्कर्ष कसा साध्य करेल याबाबत मार्गदर्शन केले.
वारसांना त्यांचे सगळे आर्थिक लाभ प्राप्त झाले किंवा नाही, याबाबत सुद्धा माहिती घेण्यात आली. सदर समुपदेशन कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट ऐकून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांचे मनात समाधानाचे भाव स्पष्ट जाणवत होते.
सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) विवेक बन्हनोटे व उप व्यवस्थापक (मानव संसाधन) अमित पेढेकर व निम्नस्तर लिपिक (मानव संसाधन) कमलेश मांडवगडे यांचे विशेष सहकार्य लाभले.