नागपूर, ता. १ : वंदे मातरम जन आरोग्य मिशन अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या संत्रा मार्केट येथे सुरू करण्यात आलेल्या ‘जन स्वास्थ्य केंद्राचे’ उदघाटन मंगळवारी (ता. १) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पार पडले. या जन आरोग्य केंद्राचे संचालन विदर्भ सेवा समिती करणार आहे.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, जेष्ठ नगरसेवक ऍड संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय तिवारी, विदर्भ सेवा समितीचे अध्यक्ष आनंद निर्वाण, सचिव अशोक गोयल, पूर्व अध्यक्ष डॉ. संतोष मोदी, समन्वयक डॉ. मो. ख्वाजा मोईनुद्दीन आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, संत्रा मार्केट जन आरोग्य केंद्राचे उदघाटन महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर झाले. प्रत्येक नागरिकाला वेळेवर आरोग्य सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. नागपूर शहरातील गोरगरीब जनतेच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेने वंदे मातरम जन स्वास्थ्य केंद्र सुरू केले आहे. संत्रा मार्केट परिसरात मध्यम वर्गीय कामगार वर्ग राहतो. त्यामुळे या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या जन आरोग्य केंद्राचे निर्माण करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
सदर आरोग्य केंद्र दररोज सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.