जनता आणि प्रतिनिधी यांच्यातील संवादच समाजाचा विकास करू शकतो – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

नागपूर, दि. 23 : लोकशाहीत लोकप्रतिनिधीबद्दल लोकांच्या मनात पुरेसा विश्वास असेल तरच जनता आणि प्रतिनिधी यांच्यात संवाद टिकून राहू शकतो आणि त्यातून संपूर्ण समाजाचा विकास होत असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, लोकप्रतिनिधींना मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळते म्हणजे सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, खासदार, आमदार हे लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघातील जनतेचे प्रतिनिधीत्त्व करुन त्यांच्या समस्या, प्रश्न सोडवून एकप्रकारे त्यांची सेवा करीत असतात. गावचा सरपंच सुद्धा गावाचा चांगला विकास करु शकतो. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील विविध विषयांचा सतत अभ्यास केला पाहिजे.

लोकशाहीत शिक्षण हा महत्त्वाचा असा भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिक शिक्षित झाला पाहिजे. आदिवासी बांधवांचीही शैक्षणिक प्रगती सुरु आहे. आदिवासी भागातील पाणीसाठे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे स्थलांतर थांबविले जाऊ शकते. आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युवकांनी पाणी प्रश्नावर अभ्यास करुन चळवळ उभी करावी. भविष्यात पाणीवाटप हा महत्त्वाचा विषय राहणार असून युवकांनी याबाबत सतत जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी नरहरी झिरवाळ यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना नरहरी झिरवाळ यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थींनी उषा सुर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायालयीन आदेशाचा आदर राखून पवना प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाची कार्यवाही - शंभूराज देसाई

Fri Dec 23 , 2022
नागपूर दिनांक २३: पवना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले असल्याने जमीन वाटपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी न्यायालयीन आदेश तपासून आणि निर्णयाचा आदर राखून काही मार्ग काढता येईल का, या संदर्भात शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. विधानसभा सदस्य सुनील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com