ऑनलाईन विक्री व व्यवस्थापन हाच आजच्या काळात महिला बचत गटांसाठी यशाचा मंत्र – जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकड्डे

– 10 दिवसीय महालक्ष्मी सरस महोत्सवास प्रारंभ

– महाराष्ट्रातील विविध खाद्य पदार्थांसह दर्जेदार उत्पादने ग्राहकांच्या भेटीला 

– जिल्हा परिषद व उमेदतर्फे भव्य व्यवस्था

नागपूर :-  बचत गटातील महिलांनी आर्थिक व्यवहारापलीकडे जाऊन आता विचार केला पाहिजे. आपल्या उत्पादनांना गुणवत्तेची जोड देत त्याचे पॅकेजिंग, मांडणी ही अधिक चांगली करण्यावर प्रयत्नशिल असणे गरजेचे आहे. ऑनलाईन विक्री व व्यवस्थापन हा आजच्या काळाचा यशस्वी मंत्र असून यासाठी नवतंत्रज्ञान साक्षरतेकडे बचत गटांनी वळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी केले.

रेशीमबाग येथील मैदानात राज्यस्तरीय अतिरिक्त महालक्ष्मी सरस महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. 10 दिवसीय चालणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाडे, अपर जिल्हाधिकारी तूषार ठोंबरे, उमेदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बापासाहेब निमाने, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, उपसंचालक शितल कदम, निलेश कारंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका वर्षा गौरकर व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांनी एक चांगला दर्जा प्राप्त केला आहे. महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंसाठी बाजारपेठ मिळावी, चालना मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासन सतत प्रयत्नशील आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन याचाच एक भाग आहे. या माध्यमातून आपल्या गुणवत्तापूर्ण उत्पादनातून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या बचत गटातील महिलांना एक चांगली संधी मिळाली आहे. मुंबईच्या पाठोपाठ नागपूर येथे राज्यपातळीवरील महालक्ष्मी सरस महोत्सवास नागपूरकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन महिला बचत गटांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी केले.

उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांची एक अभूतपूर्व चळवळ राज्य शासनाने महाराष्ट्रात रुजविली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सुमारे 3 कोटी महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ मिळणार असे जाहीर केले आहे. यादृष्टीने महाराष्ट्राला 17 लाख महिलांचे उद्दिष्ट दिले आहे. यातील सुमारे 15 लाख महिलांनी आपल्या बचत गटांच्या माध्यमातून लखपती दिदी होण्याचा मान मिळविला असून उर्वरित दोन लाख महिलांच्या लखपती दिदी होण्याचे उद्दिष्ट लवकरच महाराष्ट्र साध्य करेल, असा निर्धार उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयेश जयवंशी यांनी व्यक्त केला. नागपूर येथील राज्यपातळीवर आयोजित करण्यात आलेला हा सरस महोत्सव नागपूरकरांच्या प्रतिक्षेत असून रेशिमबाग येथील या प्रदर्शनाला अधिकाधिक लोकांनी भेट देऊन, येथील वस्तु विकत घेऊन बचत गटांच्या महिलांचा आत्मविश्वास अधिक दृढ करावा, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीसह प्रत्येक जिल्ह्यातील वैविद्यपूर्ण उत्पादने या प्रदर्शनात आहेत. जालना येथून कोवळ्या लोकरीच्या घोंगड्या, कोकणातील मालवणी मसाला, खानदेशी पापड, आपली भिवापूरची तिखट मिरची, मसाले, गाईचे तुप असे खुप सारे वैविद्यपूर्ण उत्पादने या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. सुमारे 300 स्टॉल्स या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात आहेत. 10 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाडे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा सुंदर गाव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उपस्थितांचे आभार ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका वर्षा गौरकर यांनी केले तर सुत्रसंचलन रेणुका देशकर यांनी केले. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान !

Sat Feb 17 , 2024
देहरादून :- ‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने देशभरातील सांस्कृतिक, सामाजिक आणि हिंदुत्वाच्या क्षेत्रात समर्पित भावाने उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवर व्यक्ती आणि संस्था यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सनातन संस्थेला ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ (पिलर्स ऑफ हिंदुत्व) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रचारक अभय वर्तक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com