नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांना परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दि. २० जानेवारीपासून ऍडमिट कार्ड या लिंकव्दारे डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने मंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. यात फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इयत्ता दहावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.