यवतमाळ :- भारतीय कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुरच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ अंतर्गत कळंब येथील शेतकरी वसंतराव इंगोले यांच्या शेतावर एकदिवशीय शेती दिनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे होते. तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, विषय विशेषज्ञ डॉ. प्रमोद मगर, अंकुर सीड्सचे समीर वडाळकर, दिलासा संस्थेच्या प्रियांका शिवणकर, शिवानी बावनकर, प्राची नागोसे, रविंद्र राठोड, गौरव येलकर, नयन ठाकरे, अमोल वाळके उपस्थित होते.
विदर्भातील प्रमुख पिक कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, दारव्हा, नेर, आर्णी, दिग्रस, पांढरकवडा, मारेगाव, वणी, आणि घाटंजी या १२ तालुक्यात कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र अंतर्गत अति सघन लागवड प्रकल्प राबविल्या जात आहे.
या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन आणि दादा लाड कापुस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रचार व प्रसार व्हावा यादृष्टीने एकदिवसीय शेती दिनाचे आयोजन करण्यात आले तसेच कृषि संवादिनी व कामगंध सापळ्याचे वितरण करण्यात आले .
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी कापुस पिकाबद्दल माहिती देत असतांना वाण कसे असावे, त्याच्या निवडीचे निकष तसेच कापुस पिकामध्ये पाणी व्यवस्थापन कसे असावे, तुषार सिंचनाचा वापर करून उत्पादन कसे वाढवता येईल याबाबत माहिती दिली. डॉ.सुरेश नेमाडे यांनी पिक वाढ व्यावस्थापनाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
डॉ.प्रमोद मगर यांनी एकदिवसीय शेती दिनाचे महत्व, प्रकल्पाचा उद्देश, अति सघन लागवड तंत्राज्ञान शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदेशीर होत आहे व कृषि विज्ञान केंद्रामार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्यादृष्टीने सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. कपाशीवरील कीड व रोग व्यवस्थापन, पिवळे-निळे चिकट सापळे व ट्रायको कार्डचे महत्त्व पटवून दिले. समीर वडाळ यांनी वाणांची तथा कापुस पिकातील अंतर या विषयावर माहिती दिली. प्रकल्पांतर्गत लागवड केलेले शेतकरी वसंतराव इंगोले यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना आपले अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमानंतर इंगोले यांच्या प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्राची नागोसे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.