फाईव्ह-जी तंत्रज्ञानाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद

…अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी

 फाईव्ह-जी तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :-  फाईव्ह-जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह-जीचे महत्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह-जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशव्यापी फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरुमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ मधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खुर्चीऐवजी बेंचमध्ये बसणे पसंत केले. मी ही तुमच्या सोबत आज विद्यार्थी झाल्याचे मुख्यंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पनवेल राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा, गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पनवेलच्या शाळेची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच प्रधानमंत्र्यांचे देखील आभार मानले. या नविन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजीटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी गृहरक्षक दल-नागरी संरक्षणाचे अपर पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी फाईव्ह-जी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना सहज सोप्या शब्दात समजेल अशी माहिती दिली. यावेळी सादरीकरण करताना सिंग यांनी टेलीकॉम तंत्रज्ञानाचा वन-जी ते फाईव्ह-जी असा प्रवास चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितला. मोबाईलचा वापर स्वत:च्या सुरक्षेसाठी करा, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा देशाच्या आणि स्वत:च्या चांगल्यासाठी करा, असे आवाहनही ब्रिजेश सिंग यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तिडके विद्यालयात विज्ञान प्रदर्शनी 

Sun Oct 2 , 2022
बेला :-  येथील विमलताई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीची विज्ञान प्रदर्शनी भरण्यात आली होती. त्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख मधुकर पजई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेडेश्वर येथील विद्याधन हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर राऊत, शाळेचे प्राचार्य राजेंद्र तिडके व ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम माता सरस्वती व मिसाईल मॅन डॉ.अब्दूल कलाम यांच्या फोटोला पुष्प हार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com