– मराठीचे शब्द सामर्थ्य वाढविण्यासाठी शपथबद्ध होऊया – अजय पाटील
नागपूर :- मराठी भाषा गौरव दिन म्हणजे आपल्या मातृभाषेचा अर्थात आपल्या आईचाच गौरव आहे. मराठीचे शब्द सामर्थ्य वाढावे यासाठी आपण सारे शपथबद्ध होऊया आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा गौरव करूया, असे आवाहन अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी आज येथे केले.
अ.भा. मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेतर्फे महाल येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात अजय पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते.
अ. भा. मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीचे उपाध्यक्ष आणि नागपूर शाखेचे प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर यांनी याप्रसंगी मराठी मायबोलीतूनच आपण आपला सर्वांगीण विकास साधू शकतो असा विश्वास व्यक्त करतानाच कवितेनंतर मराठी नाटकांनीच आपली मातृभाषा अधिक समृद्ध केली असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. रवींद्र भुसारी यांनी तर आभार प्रदर्शन नितीन पात्रीकर यांनी केले. याप्रसंगी किशोर डाऊ, रमेश भिसीकर, अविनाश सोनुले, प्रशांत मंगदे, संजय रहाटे, अनिल पालकर, राकेश खाडे, दीपक मते, आसावरी तिडके, कल्पना पांडे, समाप्ती देशकर, मोहन पात्रीकर, नाना मिसाळ, अभय अंजीकर, प्रवीण देशकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.