राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जगभरातील आणि राज्यातील शिवप्रेमी जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत!
आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणतात,
नागपुर – “बहुजन प्रतिपालक,रयतेचा राजा, बळीराजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य करणारे प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि समस्त शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली तर तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, शिवरायांची समाधी शोधणारे शेतकरी, महिला तसेच समाज शिक्षित झाला पाहिजे यासाठी आजीवन कष्ट करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आपल्या संस्थानात बहुजनांना आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज, बहुजनांच्या शिक्षणाचे महत्व जाणून प्रत्यक्ष मदत करणारे बडोदा नरेश सयाजी महाराज, मानवमुक्तीचा लढा तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही मानवतावादी, समतावादी विचारांची अखंड अशी साखळी आहे. तथागताने देखील “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे सूत्रच दिले आहे.
शिवाजीराजांचे सर्वाधिक महत्वाचे गुण म्हणून इतिहासकार तीन गुणांचा उल्लेख करतात ते म्हणजे क्षमता,चारित्र्य आणि संवेदनशीलता!
महाराष्ट्र राज्याची स्थापना होताना तत्कालिन कॉंग्रेस सरकारने शिवरायांच्या प्रेरणेने हे राज्य चालविण्यासाठी महाराष्ट्राची जी राजमुद्रा निश्चित केली त्यावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील वाक्ये निवडण्यात आली आहेत.
छत्रपती शिवरायांच्या कालखंडात अठरापगड जाती,धर्माची माणसे होती. यात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान धर्माची माणसेही प्रमुखपदावर होती.
कर्नाटकातील हिजाब प्रकरण बघितले तर आज शिवरायांची भूमिका आठवते. मुस्लीम सुभेदाराच्या सुनेची खण-नारळाने ओटी भरून सन्मानाने सुखरूप परत पाठविणारे शिवराय कुठे आणि
राजकीय लाभासाठी हिजाब घातलेल्या मुलींना शिक्षणास विरोध करणारे कुठे ! सर्वधर्मसमभाव, शेतकरी,बहुजन समाजाचे कल्याण ही नीती अवलंबणारे शिवराय आज पुन्हा जनमानसाला समजावून सांगण्याची वेळ आली आहे.