मनपा व अग्रेसर फाउंडेशनचा उपक्रम : श्रीनिवास रामानुजन यांना अभिवादन
नागपूर :- थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिनाच्या अनुषंगाने नागपूर शहरातील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी सामुहिक पाढे वाचन केले. नागपूर महानगरपालिका आणि अग्रेसर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ‘बे एके बे’ हे सामुहिक पाढे वाचनाचे आयोजन गुरूवारी २२ डिसेंबर रोजी महाल येथील चिटणीस पार्क येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, मिलिंद भाकरे आदी उपस्थित होते.
थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीदिनी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात येतो. नागपूर महानगरपालिका आणि अग्रेसर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महान गणितज्ञांच्या स्मरणार्थ आणि राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्याच्या उद्देशाने ‘बे एके बे’ हे गणितीय आयोजन करण्यात आले. या उपक्रमात चिटणीसपार्क येथे प्रत्यक्षरित्या ८ हजाराहून विद्यार्थी उपस्थित होते. तर ऑनलाईन माध्यमातून भारतातील विविध शहरांसह अमेरिकेतीलही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एकूणच उपक्रमात १० हजारावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गणित दिनाच्या अनुषंगाने अग्रेसर फाउंडेशनद्वारे धरमपेठ सायन्स कॉलेजची भिंत रंगविण्यात आली आहे.
यावेळी बोलताना व्हीएनआयटीचे संचालक डॉ.प्रमोद पडोळे यांनी मनपा आणि अग्रेसर फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक स्वयंसेवी संस्था विविध विषयांवर काम करतात मात्र गणितासाठी काम करणारी अग्रेसर ही संघटना आहे व त्याला मनपाद्वारे मिळणारे सहकार्य हे प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी ‘बे एके बे’ हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांचे पाढे सुधारण्यासाठी नसून विद्यार्थ्यांमध्ये गणितीय रूची निर्माण करून त्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले.
अग्रेसर फांऊडेशनद्वारे मागील १५ दिवसांमध्ये सतत काम करून सर्व शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता ५, ६, ७ गट आणि इयत्ता ८, ९, १० गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांला स्मृती चिन्ह व पारितोषिक व शहरातील विजेत्यांना ५ हजार प्रथम, ३ हजार द्वितीय व २ हजार तृतीय असे पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. व्हीएनआयटी नागपूरच्या माध्यमातून रोख बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अग्रेसर फाउंडेशनच्या ३० विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. वॅाल पेटींग करीता साऊथ मध्य सांस्कृतिक केंद्राद्वारे सहकार्य करण्यात आले.
अग्रेसर फाउंडेशनचे सचिव पीयूष बोईनवार यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे संचालन केतकी आणि हेतवी यांनी केले तर आभार संकेत दुबे यांनी मानले.