मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी ‘ग्रंथचर्चा व अभिवाचन’

मुंबई :- मराठी भाषा विभागामार्फत दिनांक 14 ते 28 जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या ‘भारतीय विरागिनी’ या पुस्तकावर ग्रंथचर्चा व अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम होईल.

ग्रंथचर्चा व अभिवाचन कार्यक्रमात डॉ.अरुणा ढेरे व डॉ.सिसिलिया कार्व्हालो हे चर्चक म्हणून तसेच योजना शिवानंद यांचा अभिवाचक म्हणून सहभाग असणार आहे. भारतीय पातळीवरील काव्यविश्वात स्त्रियांच्या कवितेचे स्थान स्वतंत्र आणि महत्त्वाचे असून काश्मीरच्या लल्लेश्वरीपासून तामिळनाडूच्या अवैयारपर्यंत आणि गुजरात-राजस्थानच्या मीरेपासून ओरिसाच्या माधवी दासीपर्यंत मध्ययुगीन स्त्रीसंतांची काव्यरचना ही भारतीय काव्यधारांतली अतिशय सशक्त अशी धारा आहे. एकूणच गौतम बुद्धाच्या काळापासून सतराव्या-अठराव्या शतकातल्या, म्हणजे सुमारे दोन हजार वर्षाच्या कालखंडातल्या भारतीय विरागिनींचा विचार केवळ पारमार्थिक नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाचा आहे.

या कवयित्रींची – संत आणि भक्त अशा स्त्रियांची कालसंबद्ध पार्श्वभूमी, त्यांनी निवडलेले भक्तिमार्ग, त्यांचा परमार्थविचार, लौकिकाविषयीची त्यांची दृष्टी, त्यांनी केलेले कौटुंबिक आणि सामाजिक संघर्ष, त्यांची जीवनसाधना आणि त्यांनी व्यक्त केलेले स्त्रीत्वाचे संवेदन यांचे दर्शन मराठी साहित्यविश्वात एकत्रितपणे व्हावे आणि मराठी विरागिनींचे भारतीय भक्तिक्षेत्राशी असलेले नाते स्पष्ट व्हावे, अशा भूमिकेने प्रस्तुत ग्रंथ हा मौलिक व संदर्भमूल्य असलेला ग्रंथ आहे.

हा कार्यक्रम सर्वांकरिता खुला असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार 2023” साठी अर्ज करण्याचे आवाहन

Thu Jan 18 , 2024
नवी दिल्ली :- देशभरातील सनदी अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत अशा अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने, सार्वजनिक प्रशासनातील पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार योजना सुरू केली आहे. वर्ष 2023 साठी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीच्या पंतप्रधान पुरस्कार योजनेत सुधारणा करून, त्यात जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासात सनदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा, विविध श्रेणी अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. श्रेणी एक मध्ये 12 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com