एका सर्व्हेनुसार सारेच पुरुष त्यांच्या बायकांनी विचारलेल्या कोणत्याही कुठल्याही प्रश्नावर मनापासून घाबरतात मनातून हादरतात मात्र बहुसंख्य स्त्रिया पुरुषांच्या, त्यांच्या नवऱ्याने विचारलेल्या एकाच प्रश्नाला घाबरतात, मुले झोपलीत का, हा तो प्रश्न. मी मात्र दरवर्षी 6 डिसेंबरला काही तास मुद्दाम शिवाजी पार्क परिसरात घालवतो त्यानंतर तेथे दृश्य बघून मनातून चिडतो, मनापासून हादरतो, मनाला वाईट वाटून घेतो, डोक्याचा भुगा करून घेतो आणि घाबरतो देखील कारण बाबासाहेबांवर नतमस्तक होण्यासाठी त्यादिवशी राज्यभरातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्य अनेक लाखो बौद्ध तेही सहकुटुंब चिल्यापिल्यांसहित कसेबसे येतात, काही ट्रक टेम्पोमधून कोंबून येतात तर काही ट्रेन्स मधून तेही तिकिटाचे पैसे नसल्याने प्रचंड त्रासाला तोंड देत विविध कटकटींना अनेक संकटांना सामोरे जात काहीही करून सहकुटुंब बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळावर माथा टेकवायला येतात, त्यांच्यासमोर उपकार केल्यासारखे अन्न वाढल्या जाते, बौद्ध खाली माना घालत चार घास घशाखाली घालतात आणि परतीच्या प्रवासाला लागतात कारण येथे मुंबईत खर्च करायला त्यांच्या खिशात दिडकीही नसते केवळ मुलाबाळांना, उद्या आपला असेल, असे स्वप्न दाखवत पुन्हा वर्षभर दारिद्र्याच्या अपमानाच्या कष्टाच्या खाईत सहकुटुंब स्वतःला ढकलून मोकळे होतात. मात्र महागड्या कार्स मधून उंची वस्त्रे नेसून जे मोजके रुबाबात त्या शिवाजी पार्कवर येतात त्यातले काही भ्रष्ट सरकारी कर्मचारी अधिकारी असतात तर काही बौद्धांमधले जातीच्या भरवशावर आणि जातीला उल्लू बनवून नवश्रीमंत झालेले नेतेगण असतात ज्यांनी जातीच्या नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक विकासाचा ध्यास घेतलेला असतो कारण हे असे केवळ वर्षा गायकवाड नितीन राऊत संस्कारतले जातीला बाजूला सारून बौद्धांना अडगळीत टाकून मोठे झालेले असतात…
एका जमान्यात जसे आपण कधीही लालूंच्या राबडीचे पोट रिकामे बघितले नव्हते कारण राबडीचे एकामागून एक बाळंतपण संपत नव्हते तेच मी रामदास आठवलेना याच पद्धतिने बघत आलो आहे म्हणजे 1990 ते आजतागायत, सुरुवातीला राज्यात त्यानंतर केंद्रात ते सतत मंत्री आहेत असतात, भेटायला येणाऱ्या अडचणीत सापडलेल्या त्यांच्या बौद्ध बांधवांना ते न थकता न थांबता अगदी मनापासून सहकार्य करतात, मदत करतात परंतु हेच बौद्ध बंधू भगिनी आर्थिक दृष्ट्या बळकट सक्षम होण्यासाठी किंवा त्यांनी शैक्षणिक प्रगति साधण्यासाठी याच नवश्रीमंत बौद्ध नेत्यांनी अधिकारयांनी इतरांसारख्या संस्था उभ्या करून अख्ख्या बौद्धांना त्या बाबासाहेबांच्या पद्धतीने आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करण्यासाठी पाऊल उचलल्याचे कधीही दिसत नाही दिसलेले नाही, जो बौद्ध मोठा होतो तो स्वतः धडपड करून काबाडकष्ट करून पुढे गेलेला असतो त्यात त्याला नेत्यांचे किंवा त्यांच्यातल्या बड्या अधिकाऱ्यांचे पुढे गेलेल्यांचे अजिबात सहकार्य मिळालेले नसते. सर्व श्री रा सु गवई बॅरिस्टर खोब्रागडे एकनाथ गायकवाड बाळकृष्ण वासनिक मुकुल वासनिक सरोज खापर्डे उत्तम खोब्रागडे नितीन राऊत वर्षा गायकवाड दयानंद मस्के प्रीतमकुमार शेगावकर अविनाश महातेकर प्रकाश आंबेडकर रामदास आठवले एन एम कांबळे दादासाहेब किंवा प्रेमानंद रुपवते चंद्रकांत हंडोरे बी सी कांबळे डॉ आर डी भंडारे किंवा असंख्य शासकीय प्रशासकीय पोलीस अधिकारी माझ्या यादीत आहेत त्यातील बहुसंख्य जे मालामाल झाले त्यांनी फक्त स्वतःचे कुटुंब मोठे केले, समाजाला वेळोवेळी भडकावून त्यांना रस्त्यावर उतरवून कायम रस्त्यावरच ठेवले इतर मूठभर सामान्य बौद्धांच्या भरवशावर मात्र स्वतःच्या ताटात तेवढे मिष्टान्न वाढून घेतले…
वाचक मित्रांनो, राज्यातल्या आजतागायतच्या सत्तेतल्या बौद्ध नेत्यांची यादी लांबलचक आहे, चंद्रकांत हंडोरे पद्धतीचे कित्येक जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका प्रसंगी आमदार खासदार झाले पण त्यातल्या एकानेही बौद्धांच्या आर्थिक सामाजिक भल्यासाठी भरीव कामगिरी करून दाखवलेली नाही म्हणून मुंबईकर दरवर्षी सहा डिसेंबरला फक्त आणि फक्त दारिद्र्यात खितपत पडलेले अडाणी अज्ञानी गरीब अगदीच सामान्य बौद्धांचे लोंढे बघतो, हताश होण्यापलीकडे ना आपल्या हातात काही असते ना त्या निराश झालेल्या सर्वसामान्य बौद्धांच्या, एक मात्र नक्की कि बौद्धांमध्ये जन्माला आलेली बंधुराज लोणे, मधू कांबळे युवराज मोहिते शिर्के बंधू पद्धतीची आक्रमक बुद्धिमान कष्टाळू धडपडी मीडिया कौतुकाला पात्र कारण स्वतःची जात एकही क्षण न लपविता अतिशय ताठ मानेने न घाबरता हे असे बहुसंख्य बौद्ध धर्मीय पत्रकार समाजाच्या बौद्धांच्या भल्यासाठी कायम आघाडीवर असतात, पडतात तरी धडपड करून पुन्हा कामाला लागतात, मला राज्यातल्या या बौधांमधल्या मीडियाचे सतत कौतुक वाटते किंबहुना बौद्धांमधल्या मीडियाशी मी मुद्दाम ओळख करवून घेऊन त्यांच्याशी वेळोवेळी बोलतो माझ्या ज्ञानात त्यातून खूप भर पडते. यापूढे या आक्रमक बौद्ध मीडियानेच त्यांच्या श्रीमंत पण स्वार्थी मंडळींवर तुटून पडावे त्यांना समाजाच्या भल्यासाठी काम करण्या कंपल्शन करावे, प्रगत बौद्ध देशाची गरज आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी