• जन आशीर्वाद यात्रेला उत्तर नागपूरात उदंड प्रतिसाद
नागपूर :- एकीकडे शहरात शाळा, आरोग्य केंद्र आणि स्वच्छ पाण्यासारखी सुविधा नसताना दुसरीकडे फुटाळा तलाव येथे कोट्यवधी रुपये खर्च करुन म्युझीकल फाऊंटेन प्रकल्प भाजपच्या नेत्यांनी तयार केला. मात्र कोट्यावधी रुपये खर्चूनी आतापर्यंत तो प्रकल्प नागरिकांसाठी निरउपयोगी ठरला आहे. हे सर्व मनमानी पद्धतीने सुरु असून नागरिकांना ना मुलभूत सुविधा मिळाल्या ना फाऊंटेन, त्यामुळे भाजपला जनताच घरी बसवणार असून त्यांचे दिवस भरले असल्याचे इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी सांगितले. शुक्रवारी शहरातील इन्फ्यूएंसर्सशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
*(आपल्या माहिती करिता: फुटाळा येथील पूर्ण म्युझिकल फाऊंटेन प्रकल्पावर आतापर्यंत सरकारने १६० कोटी खर्च केले आहे)
पुढे ठाकरे म्हणाले की, “जनतेने सेवेची संधी दिल्यास कुठलेही विकासकार्य करण्यापूर्वी नागरिकांचा अभिप्राय घेणे गरजेचे असते. मात्र सत्ताधारी भाजपकडून गेल्या दहा वर्षात मनमानी पद्धतीने जनतेच्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्या गेली आहे. शहरातील ७० टक्के जनता मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. दर्जेदार शिक्षण देणारी शाळा, निशुल्क उपचार सुविधा देणारे आरोग्य केंद्र, स्वच्छ पिण्याची पाणी नागरिकांना हवे आहे. ह्या सुविधा न देता फुटाळा येथील म्युझिकल फाऊंटेनवर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्या गेली. शहरातील एक पुल पाडून त्याच ठिकाणी दुसरा तयार केला. असे अनेक प्रकल्पाद्वारे मनमानी निर्णय अहंकारी निर्णय भाजपने घेतले आहे. जनता या मनमानीला कंटाळली आहे”
सायंकाळी विविध चार जाहीर सभांचे आयोजन कऱण्यात आले होते. यात प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, बबनराव तायवाडे, विशाल मुत्तमेवार, प्रफुल गुडधे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
*उत्तर नागपुरातील जनतेलाही हवे परिवर्तन
महागाई, बेरोजगारीने नवे विक्रम गाठले आहे. संवैधानिक संस्थांना हाताशी धरुन लोकशाहीवर प्रहार करण्याचे काम सरकारकडून होत असून ही लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी ग्वाही उत्तर नागपुरातील जनतेने शुक्रवारी उत्तर नागपुरात आयोजित जन आशीर्वाद यात्रेत दिली. याची सुरुवात ऑटोमोटिव्ह चौक येथून झाली. पुढे रिंग रोड-यशोधरा चौक-वनदेवीनगर चौक-गांधी चौक-नामदेव नगर- कांजीहाऊस चौक-धम्मदीप नगर-बिनाकी-सोनार टोली मार्गे जाऊन समर्पण हॉस्पिटल रो़डवर रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्रामुख्याने माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, गीतेश मुत्तमेवार, सुनीता ढोले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.