संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील वीस वर्षापूर्वी घरोघरी वीज नव्हती त्यावेळी कंदील शामदाणी व इतर दिवे वापरले जायचे.ग्रामीण भागात अतिशय गरीब कुटुंब जे कंदील व शामदानीही विकत घेऊ शकत नव्हते अशा गरीब कुटुंबात काचेच्या शिशीच्या झाकणाला छिद्र पाडून त्यात कापडाची वात टाकायचे व शिशिमध्ये रॉकेल भरून तो दिवा पेटवायचा.मोठा दिवा असला तर त्याला टेंभा आणि लहान दिवा असला तर त्याला चिमनी म्हणायचे.तर याच दिव्याच्या प्रकाशात बिड्या बांधून अनेकांनी आपले आयुष्य काढले मात्र या आधुनिक डिजिटल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक युगात टेंभाही गेला आणि चिमणीही. त्यामुळे नवीन पिढीला टेंभा व चिमणीची ओळखही राहली नाही तर जुने कंदिलही आणि दिवे आता नामशेष राहिले आहेत.
काळानुसार माणूस माणसाच्या सवयी राहणीमान पद्धती परिस्थिती बदलत असतात हे अगदी खरे आहे.एकेकाळी कंदिलाला फार महत्व होते.कारण कंदील हातात धरून कुठेही सहज नेता येत होता.घरापासून गोठ्यापर्यंत शेतात तसेच रात्रीच्या वेळी गावात काही कामानिमित्त जायचे त्यावेळी प्रत्येकाच्या हातात कंदील हा शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोबतीलाच असायचा.त्यानंतर गावोगावी घरोघरी काही सदन व्यक्तीकडे वीज आली मात्र शेतकऱ्यांसह सामान्य माणसाकडे कंदील टेंभा व चिमणीचा वापर सुरू होता मात्र या इलेक्ट्रॉनिक युगात विविध लाईट व बॅटरी आल्यामुळे या वस्तूच्या वापराकडे पूर्णता दुर्लक्ष झाले आहे.
रॉकेल मिळणे बंद झाले आहे तेव्हा रॉकेल भरून दिवाबत्ती करण्यापेक्षा चायनामेड बॅटरीचा वापर सहज आणि सुलभ वाटत असल्याने नागरिकांची पसंती आता बॅटरीला दिसून येत आहे.पूर्वी गावात रात्रीच्या वेळी लग्न किंवा इतर कार्यप्रसंग करण्यासाठी गॅसबत्तीचा वापर केला जायचा .गॅसबत्तीला मेटल लावून हाताने पंप भरून हवा मारली की लक्ख प्रकाश दिसायचा त्या प्रकाशात कीर्तन ,प्रवचन, विवाह,समारंभ ,सामाजिक कार्यक्रम व इतर उत्सव होत होते.मात्र एकेकाळी अनेकांना लख्ख प्रकाश देणाऱ्या या वस्तू आता कालबाह्य झाल्या आहेत. मात्र त्याचे विस्मरण होऊ शकत नाही ते दिवस आजही जुन्या लोकांच्या स्मरणात कायम असल्याचे दिसून येते.