चंद्रपूर :- शहरातील मालमत्ताधारकांना करांचा भरणा सुलभरीत्या करता यावा म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. मालमत्ता – पाणीपट्टी कर भरणे आता अधिक सोपे झाले असुन, नागरीक युपीआय ॲपचा वापर करून मोबाईलद्वारे सुद्धा कर भरू शकतात.
शहरात ८० हजारांपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या कराची रक्कम रोखीने अथवा धनादेशाद्वारे अदा करण्याची पद्धत आहे. यात महापालिका कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत असतात किंवा संबंधित मालमत्ताधारक पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये जाऊन रकमेचा भरणा करीत असतात. मात्र अनेकदा वेळेच्या अभावामुळे अथवा कार्यालयातील गर्दीमुळे प्रत्यक्ष रोखीने अथवा धनादेशाद्वारे कर भरण्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी नागरिकांना करभरणा करताना सोयीचे व्हावे म्हणून युपीआय ॲपशी कर प्रणाली लिंक करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले होते.
आतापर्यंत www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य होते,आता यासोबतच फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येणे शक्य आहे. मनपातर्फे मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. ६ फेब्रुवारीपासून ही योजना सुरु झाली असून, २८ फेब्रुवारी रोजी १०० टक्के माफीची शेवटची मुदत आहे. तसेच १ ते १५ मार्च ५० टक्के सूट मिळणार असुन मालमत्ता कराचा भरणा करण्यास शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरु राहणार असल्याने शास्तीमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता व पाणी कराचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना मालमत्ता करावरील शास्तीत १०० टक्के सूट ६ ते २८ फेब्रुवारी तर १ मार्च ते १५ मार्च पर्यंत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना मालमत्ता करावरील शास्तीत ५० टक्के सुट जाहीर करण्यात आली आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी असल्याने वसुलीसाठी प्रत्येक झोननिहाय जप्ती पथक गठीत करण्यात आले असुन सदर जप्ती पथके पुर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. १०० टक्के सूट मिळविण्यासाठी कार्यालयीन वेळेत भरणा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.