आयुष्यात दरवर्षी नवीन वर्ष येणार आणि जुने जाणार आहे. 31 डिसेंबर येताच सर्वजण आनंदाने नाचतात आणि नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करून पुन्हा आपल्या कामाला लागतात. पण मानवीय भूमिकेचे काय याचा विचार करायला कुणाकडेही वेळ नाही. जो कोणी यावर बोलणार त्याला लोक मुर्खात काढणार आहेत. पण मित्रांनो लोक काहीही बोलो आपण चांगले कार्य करण्याचे प्रयत्न सोडू नये. जर आपण सत्कृत्याचे प्रयत्न सोडले तर सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू होईल. यामुळे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जावो अशा शुभेच्छा देण्यापेक्षा मी आजपासून षड्रिपू सोडत आहे असा संकल्प सर्वांनी करावा. अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांना सहा विकार मानले जाते. याच विकारांमुळे मानवी आयुष्यात वादळ येत असतात. पण जेव्हा हेच विकार आपण बाजूला सारले तर बहुतांश समस्या आपोआप सुटतील नाही का? मग याच सहा विकारांना आपण सोडणार असा संकल्प करीत तोच अमलात आणला तर नक्कीच देशात रामराज्य येऊ शकते. तसे पाहता संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना आनंद होईल अशी कृती राम मंदिराच्या बांधकामामुळे झाला आहे. प्रभू रामचंद्रांचे दर्शन अयोध्येत जाऊन घेण्याचा योग सर्वांनाच 22 जानेवारी 2024 पासून मिळणार आहे. हा सर्व दुग्धशर्करा योग पाहता खरोखरच आपण सहा विकारांना मूठमाती देणे काळाची गरज आहे. जेव्हा प्रत्येकजण सहा विकारांना आपल्या आयुष्यातून तडीपार करतील तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला सर्वांनाच दिसतील. मग हाच संकल्प सोडण्याचा प्रयत्न मी स्वत: करणार आहे. तसे पाहता आयुष्य क्षणभंगूर आहे. कुठलाही भरवसा राहिलेला नाही. नश्वर देहाचा भरवसा नसतानाही आपण सहा विकारांना जोपासणे योग्य होणार नाही. देशात आणि जगाचा सुक्ष्म अभ्यास केला असता प्रत्येकजण एकमेकांवर तुटून पडण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसर्यांची रेषा कापण्याचा प्रयत्न चांगला नाही. प्रयत्न करायचा असेल तर आपली रेषा मोठी करा ना? मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत माझ्या शर्टापेक्षा तुझा शर्ट पांढरा कसा असाच जळफळाट समाजात पुन्हा एकदा वाढलेला आहे. हा जळफळाट दूर सारावाच लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले होते की, अन्याये पिडा न होवो कुणास। न व्हावा मुंगीलाही त्रास। याची जाणीव असावी प्रमुखास। सदासर्वकाळ हीच भूमिका सर्वांनी अंमलात आणावी. जगा आणि जगू द्या हेही तत्त्व अनुसरणे काळाची गरज आहे. भगवान महावीरांनी म्हटल्याप्रमाणे क्षमा विरस्य भूषणम् याचाही स्वीकार करून चूक करणार्यांना माफ करा आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवण्यावरही नवीन वर्षांपासून शुभारंभ करावा. जर यासर्व गोष्टी खरोखरच अस्तित्वात आल्या किंवा प्रत्येकाने मनापासून स्वीकारल्या तर नक्कीच या देशात रामराज्य येईल. जेव्हा रामराज्य येईल तोच दिवस आपल्यासाठी नव्या युगाचा शुभारंभ ठरेल.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा…..! धन्यवाद…! नमस्कार….!!!
आपलाच
अनिल उमाकांत फेकरीकर