– मोतीबिंदू, ह्रदयरोग शस्त्रक्रिया झालेल्या ज्येष्ठांनी घेतली भेट; जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांची गर्दी
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या अंतर्गत मोतीबिंदू व हृदयरोग शस्त्रक्रियेचा लाभ झालेल्या नागरिकांनी आज (रविवार) मंत्री महोदयांची भेट घेतली. यात समावेश असलेल्या बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी ना. गडकरी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आशीर्वादही दिले. हृदयरोग शस्त्रक्रिया झालेल्या तरुणांनी देखील ना. गडकरी यांचे आभार मानले.
ना. गडकरी यांना प्रत्यक्ष भेटता येणार म्हणून खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांची गर्दी होती. कुणी संजय गांधी निराधार योजनेसाठी, तर कुणी रस्त्याच्या कामांसाठी, कुणी नोकऱ्यांसाठी तर कुणी नाविन्यपूर्ण प्रयोगांचे प्रेझेंटेशन देण्यासाठी मंत्री महोदयांची भेट घेतली. याच गर्दीत काही पाणावलेले डोळे ना. गडकरी यांच्या भेटीसाठी आतूर झाले होते. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मोतीबिंदूमुक्त नागपूर’ अभियानांतर्गत शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपल्या भावना प्रत्यक्ष मंत्री महोदयांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनसंपर्क कार्यक्रमात सहभागी झाले होते. ‘साहेब, तुमच्यामुळे आम्हाला मोठा आधार झाला’, या शब्दांत त्यांनी आपले भाव व्यक्त केले. ‘आमची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.
अशात हार्टच्या ऑपरेशनचा खर्च करणे आम्हाला शक्य नव्हते. पण संतोष यादव यांनी आमच्या वेदना गडकरी साहेबांपर्यंत पोहोचवल्या आणि आमचे ऑपरेशन होऊ शकले,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यासोबतच माजी सैनिकांची संघटना, ऊस उत्पादक शेतकरी, उद्योजकांच्या संघटना, कामगार संघटना आदींनी ना. गडकरी यांची भेट घेऊन विविध मागण्यांसाठी निवेदने दिली. कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या पुण्यातील महिला शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने देखील मंत्री महोदयांची भेट घेतली.
बालकांचे कौतुक
विविध परीक्षा, स्पर्धा तसेच उपक्रमांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या बालकांचे ना. गडकरी यांनी कौतुक केले. मंत्री महोदयांनी कौतुक केल्यानंतर चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा होता.
दृष्टीहिन क्रिकेटपटूंची खास भेट
यावेळी दृष्टीहिन क्रिकेटपटूंनी ना. गडकरी यांची भेट घेऊन राष्ट्रीय टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन विदर्भच्या पदाधिकाऱ्यांसोबत आलेल्या खेळाडूंनी एक विशिष्ट्य प्रकारचा क्रिकेटचा चेंडू ना. श्री. गडकरी यांना भेट दिला. फटका मारल्यानंतर चेंडूमधील छर्रे आवाज करणार आणि त्या आवाजाच्या आधारावर क्षेत्ररक्षकांना अंदाज घेता येणार. ना. गडकरी यांनी या प्रयोगाचे कौतुक केले आणि अतिशय आनंदाने ही भेट स्वीकारली.