अमरावती :- महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय तसेच सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विविध टप्प्यात आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा 2 फेब्राुवारी पासून सुरू झाला असून विद्यापीठांच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला आहे. कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनाला संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी प्राचार्य फोरम व नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशन (नुटा) या संघटनांनी पाठिंबा दिला असून तसे पत्र महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक व महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांना दिले आहे. महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10.20.30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय तसेच माहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचायांना लागू करणे, सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचायांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचायांना दिनांक 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचायांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे, 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचायांना जुनी पेंशन योजना लागू करणे, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचायांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे इत्यादी मागण्यांच्या पूर्तेतेसाठी गेल्या चार वर्षापासून संघटना सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.
शेवटी संघटनेला सप्टेंबर 2021 मध्ये 11 दिवसांचे कामबंद आंदोलन करावे लागले आणि तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थि करून आंदोलन मागे घ्यावयास लावले. मांगण्यांची पूर्तता लवकरच करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले. एवढेच नव्हे, तर विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी बैठकीचे आयोजन केले होते. परंतू तोडगा न निघाल्याने संघटनेला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला आहे. सदर आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरु असून 2 फेब्राुवारी पासून सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. यानंतर 14 फेब्राुवारी रोजी दुपारी 2.00 ते 2.30 अवकाश काळात निदर्शनेे, 15 फेब्राुवारी रोजी काळ्या फिती लाऊन कार्यालयीन काम करणे, 16 फेब्राुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप असे आंदोलन करण्यात येणार आहे. याउपरही शासनाने कोणतीही दखल न घेतल्यास 20 फेब्राुवारीपासून सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद राहणार आहे. विद्यार्थी वा त्यांच्या पालकांना वेठीस धरण्याचा संघटनेचा मुळीच हेतू नसून या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन कर्मचारी संघटनांनी केले आहे.