– लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा – ना.सुधीर मुनगंटीवार
– पाचही जागेवर भाजप महायुतीचा विजय निश्चित
चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज दुपारी रांगेमध्ये लागून सहकुटुंब चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी सपना मुनगंटीवार, जावई डॉ. तन्मय बिडवई,मुलगी डॉ. शलाका मुनगंटीवार – बिडवई, उपस्थित होते.
राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली असून विदर्भातील पाच मतदारसंघात आज मतदान सुरू आहे. त्यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, व भंडारा-गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या एकुण पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानाचा आज पहिला टप्पा असून सध्या विदर्भात मतदान सुरु झाले आहे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठा विकास झाला आहे. विकासाच्या बळावर जनता भाजप महायुतीसोबत आहे. निवडणुकीत भाजप रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होईल. तसेच नरेंद्र मोदीच पुन्हा प्रधानमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये व्यक्त केली.
लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करा
मतदान हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदान करणे आपला अधिकार असून, त्याचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करा. मी सहकुटुंब मतदान केल आहे, जनतेला माझं आवाहन आहे की, आपण सर्वांनी मतदान कराव. सगळ्यांनी मतदानासाठी घराबाहेर पडलं पाहीजे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले आहे.
पाचही जागेवर भाजपा महायुतीचा विजय निश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी जनतेने मतदानाच्या रुपाने आहुती द्यायला हवी. मतदानाचं प्रमाण हे जास्तीत जास्त झाले पाहिजे. लोकसभा निवडणूक ही आमची परीक्षा आहे. यामध्ये नक्कीच आम्ही उत्तीर्ण होऊ. असं म्हणत पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही जागावर भाजप महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.