जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर शहराची रँक वाढविण्यासाठी मनपातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून यात नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपातर्फे होम/ऑनसाईट कंपोस्टिंग (ओल्या कचऱ्याची जागीच प्रक्रिया) स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा वैयक्तिक घरगुती स्तरावर, निवासी कल्याण संघटना/सोसायटी स्तरावर आणि हॉटेल/इन्स्टिट्यूशन अशा तीन श्रेणीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख २५ एप्रिल २०२२ असून यात प्रवेश निःशुल्क आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा नागपूर शहरापुरतीच मर्यादित असून इच्छूक स्पर्धकांनी २५ एप्रिल २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत स्वच्छ भारत अभियान कक्ष, पाचवा माळा, बी विंग, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१ येथे किंवा संबंधित महानगरपालिकेच्या झोन कार्यालयामधील घनकचरा व्यवस्थापन विभागात अथवा ऑनलाईन माध्यमातून https://forms.gle/y3 HPtponh CHAxaK78 या लिंकवर आपले अर्ज जमा करावे. स्पर्धेच्या सविस्तर माहिती साठी या https://www.nmcnagpur.gov.in/assets/250/2022/04/mediafiles/Competition_Final.pdf लिंकवर क्लिक करा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा अर्ज याच लिंकवर देण्यात आलेला आहे.
स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना तिन्ही स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात प्रथम पुरस्कार : १० हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार : ५ हजार रुपये व प्रमाणपत्र तसेच तृतीय पुरस्कार : ३ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येईल. सोबतच श्रेणी एक मधील सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. त्यामुळे या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागपूरकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.
आवश्यक सूचना :
१. २५ एप्रिल नंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
२. एक स्पर्धक वरीलपैकी कितीही स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
३. आपले अर्ज जमा करताना संपूर्ण माहिती अचूक भरली आहे याची खात्री करून घ्यावी.
४. सदर स्पर्धेकरिता प्रवेश नि:शुल्क आहे.
५. कोणत्याही प्रकारचा बनाव केल्याचे निदर्शनास आल्यास स्पर्धकास स्पर्धेतून तात्काळ अपात्र करण्यात येईल. याबाबत मा. आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहिल.
६. कोणत्याही स्पर्धेत भाग घेत असताना मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील.
७. स्पर्धेचे निकाल सुयोग्य दिवशी सार्वजनिक स्वरूपात www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.
८. कुठल्याही अधिक माहिती करिता nmcsbmcitizenengagement@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.