मनपा आयुक्तांनी दिली इंग्रजी शाळांना भेट

विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक स्थितीचा घेतला आढावा

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मंगळवारी (ता.१२) मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा शिक्षकांकडून आढावा घेतला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, समन्वयक विनय बगले व आकांक्षा फाऊंडेशनचे श्री. सोमसूर्व चॅटर्जी उपस्थित होते.

     नागपूर शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना नि:शुल्क इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, पुढे त्यातून ते आपल्या स्वप्नांना बळ देउ शकतील, या उद्देशाने मनपाच्या इंग्रजी शाळांची संकल्पना पुढे आली व ती साकारही झाली. त्यानुसार शहरातील झोपडपट्टी भागातील मनपाच्या बंद शाळांमध्ये पुन्हा चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू झाला. मनपाच्या पुढाकारामुळे शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या  दर्जेदार शिक्षणाची द्वारे खुली झाली. राणी दुर्गावती प्राथमिक शाळा (उत्तर नागपूर), बाभुळबन मराठी प्राथमिक शाळा (पूर्व नागपूर), स्व. बाबुरावजी बोबडे मराठी प्राथमिक शाळा (दक्षिण-पश्चिम नागपूर), रामनगर मराठी मराठी प्राथमिक शाळा (पश्चिम नागपूर), रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळा (दक्षिण नागपूर) आणि स्व. गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळा (मध्य नागपूर) या सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सहा विधानसभा क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आल्या. या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशाचा शुभारंभ होताच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष शाळांमध्ये शिक्षणात येणा-या अडचणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधामध्ये दिलासा मिळाल्यानंतर प्रत्यक्ष वर्गामध्ये चिमुकल्यांचे शिक्षण सुरू झाले आहे. नागपूर शहरातील गोरगरीब जनतेसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्थिती, येथील शिक्षणाचादर्जा, सुविधा, विद्यार्थ्यांची प्रगती या सर्व बाबींची पडताळणी करून पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या शाळांना भेट दिली.

            इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संचालनाची जबाबदारी आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेला देण्यात आलेली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून शाळांचा चेहरामोहराच बदलण्यात आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी, शिक्षणासह त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यादृष्टीने शाळेत विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिले जात आहे. या शाळांमध्ये प्रवेश करताना कॉर्पोरेट दर्जाच्या खासगी शाळांमध्ये आल्याचा भास होतो. शाळेच्या बोलक्या भिंती, वर्गातील रंग, त्यावरील बोलके चित्र, विद्यार्थ्यांसाठी टेबल, त्यावर शैक्षणिक साहित्य, या सर्व बाबी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करीत आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शाळेतील प्रत्येक बाबीची बारकाईने पाहणी केली, विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनीही आयुक्तांपुढे वाचन केले, कविता म्हणून दाखविल्या, काढलेले चित्र दाखविले.

     विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कुठलीही तडतोड होणार नाही याकडे विशेष लक्ष देताना शाळेतील शिक्षकांची नियुक्ती त्यादृष्टीने करण्यात आली आहे. शाळांसाठी मनपातर्फे इमारत दुरूस्ती, विद्युत व्यवस्था , पाणीव्यवस्था, गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार याची जबाबदारी  स्वीकारण्यात आली आहे. तर आकांक्षा फाऊंडेशनद्वारे शालेय प्रशासन व व्यवस्थापन, शाळांमध्ये नियुक्त करावयाचे शिक्षक, शाळेचा दर्जा आदी बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. शिक्षकांची नियुक्ती व त्यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण फाऊंडेशनद्वारे देण्यात आले आहे. समन्वयातून करण्यात आलेल्या कार्याचे फलीत आज प्रत्यक्ष या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीतून दिसून येत आहे. मनपा आयुक्तांनी एकूणच सर्व शैक्षणिक व्यवस्थेवर समाधान व्यक्त करीत यामध्ये येणा-या अडचणी आणि आवश्यक सुधारणांवर प्रशासकीय स्तरावरून कार्यवाही करण्याबाबत यावेळी शाश्वस्त केले.

     नागपूर शहरातील झोपडपट्टी भागात राहणारे, गोरगरीब नागरिक केवळ परिस्थितीपोटी इच्छा असूनही मुलांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देउ शकत नाहीत. प्रतिभा असूनही अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांची परिस्थिती अडसर ठरते. अशा पालकांच्या मुलांप्रति असलेल्या स्वप्नपूर्तीसाठी, विद्यार्थ्यांसाठी मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा एक मोठे आशास्थान ठरत आहे. नि:शुल्करित्या शहरातील गोरगरीब घरातील विद्यार्थ्यांनी दर्जेदार इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेउन पुढील स्पर्धेसाठी सक्षम व्हावे, हा मनपाचा उद्देश या शाळांच्या माध्यमातून साकार होत आहे. मनपाच्या शाळांमधून झेप घेत परिस्थितीला हरवित अनेक विद्यार्थ्यांनी आपली छाप सोडली आहे. प्रतिभा असून परिस्थिती आड येउ नये यासाठी मनपाने घेतलेल्या पुढाकारातून आता आणखी विद्यार्थी पुढे येउन नागपूर शहराचे नावलौकीक करतील यात शंका नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महावीर जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने बंद

Wed Apr 13 , 2022
नागपूर :  “महावीर जयंती” दिनाला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गुरूवार दिनांक १४ एप्रिल, २०२२ ला “महावीर जयंती” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.           तसेच “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती” दिनानिमित्त गुरूवार दिनांक १४ एप्रिल, २०२२ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com