मुंबई – युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून महावितरणच्या यंत्रणेचा वापर केला जात आहे. या निवडणुकीत त्यांचा मुलगा उभा असल्याने राऊत यांनी महावितरणच्या यंत्रणेचा बेकायदेशीरपणे वापर सुरू केला आहे.
युवक कांग्रेस निवडणुकित उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून महावितरणच्या यंत्रणेचा वापर केला जात आहे. या निवडणुकीत त्यांचा मुलगा उभा असल्याने राऊत यांनी महावितरणच्या यंत्रणेचा बेकायदेशीरपणे वापर सुरू केला आहे, असा आरोप भाजपच्या युवा मोर्चाने केला आहे. या प्रकरणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात आहे. तसे सिद्ध झाल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली.
नवी मुंबईत वाशी येथे सोमवार 6 डिसेंबर रोजी महावितरणचे अधिकारी एका बैठकीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत सादर केली. या कामात मदत करण्यासाठी ‘वरून दबाव ‘ आहे. तसेच या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस मिळेल, मदत न केल्यास त्याचेही ‘फळ’ मिळेल अशा भाषेत महावितरणचे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते. या बैठकीच्या ठिकाणी विक्रांत पाटील, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रशांत कदम आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला व संबंधित अधिकाऱ्यांना जाबही विचारला. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या चिरंजीवांना निवडणुकीत कसे साह्य करावयाचे आहे याची टिपणे आढळून आली आहेत. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
वाशी येथील घटनेतून महावितरणची यंत्रणा नितीन राऊत यांनी आपल्या चिरंजीवांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधली असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून राऊत यांनी ऊर्जामंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.