नागपूर :- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी बुधवारी (ता.२६) पदभार स्वीकारला. नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पृथ्वीराज बी.पी. यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले व त्यांच्याकडे स्मार्ट सिटी सीईओ म्हणून पदभार सुपूर्द केला.
यावेळी नागपूर स्मार्ट सिटीचे संचालक सि.ए. आशीष मुकीम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पृथ्वीराज बी.पी. यांनी नागपूर शहर हे स्मार्ट, सस्टेनेबल आणि शहरीकरणाच्या दृष्टीने उत्तम शहर व्हावे ही सीईओ म्हणून प्राथमिकता राहिल, असे सांगितले. त्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि इतर वेगवेगळ्या स्थानिक संस्थांशी समन्वय साधून सुरू असलेले प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याकडे प्राधान्य असेल. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या मुख्य प्रकल्पांचा आढावा घेउन हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यादृष्टीने पुढील नियोजन असेल, असेही त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज बी.पी. हे २०१४ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. ते मुळचे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. आयआयटी मुंबई येथून अभियांत्रिकी आणि आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए ची पदवी घेउन पृथ्वीराज बी.पी. यांनी तीन वर्ष आयटी कंपनीमध्ये कार्यरत होते. नंतर २०१४ साली भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये त्यांची निवड झाली.
पृथ्वीराज बी.पी. हे लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्काराने मा. पंतप्रधानांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. त्यापूर्वी त्यांनी सोलापूर येथे परिविक्षाधीन कालावधी तर भंडारा येथे आदिवासी विकास प्रकल्पात काम केल्यानंतर परभणी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.