नागपूर : मतदारांनी व विशेष म्हणजे नवमतदारांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले आधार जोडणी करावीच त्यासोबतच आपल्या परिसरात राहणाऱ्या कमीतकमी 20 मतदारांचे आपल्या मोबाईलव्दारे आधार जोडणी करावी जेणे करुन नागपूर जिल्हयातील सर्व मतदारांचे आधार जोडणी करुन लोकशाही प्रक्रीयेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोग यांचेकडून प्राप्त निर्देशानूसार 1 ऑगस्ट 2022 पासून नागपूर जिल्ह्यातील मतदारांच्या निवडणूक ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांच्या मतदान ओळखपत्रासह आधार क्रमांकाची जोडणी केल्यामुळे मतदार यादीतील मतदारांचे प्रमाणिकरण होवून दूबार मतदार संख्या निश्चितच कमी होणार आहे. त्यामुळे नागपूर जिल्हयातील 100% मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण मतदार 90055548 असून त्यापैकी 39168512 इतक्या म्हणजेच 43.49 टक्के मतदारांनी आधार जोडणी केलेली आहे. त्यात नागपूर जिल्हयातील एकूण 4069799 मतदारापैकी 1169961 इतक्या म्हणजेच 28.75 टक्के मतदारांनी आधार जोडणी केलेली आहे. अद्यापपवेतो नागपूर जिल्हयातील 71.25 टक्के मतदारांची आधार जोडणी करण्याचे काम शिल्लक आहे.
त्यातही नागपूर ग्रामीण भागात आधार जोडणीस प्रतिसाद मिळत असून नागपूर ग्रामीण भागाच्या एकूण मतदार 1963991 पैकी 882034 म्हणजे 44.91 टक्के मतदारांनी आधार जोडणी केलेली आहे व नागपूर शहरातील एकूण 2105808 मतदारापैकी 287927 मतदारांनी म्हणजेच 13.67 टक्के मतदारानी आधार जोडणी केलेली आहे. नागपूर शहराच्या मतदारापेक्षा ग्रामीण भागात मतदारांनी मोठया प्रमाणात आधार जोडणी केल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्हयात आधार जोडणी करीता महाविद्यालयात, शासकीय कार्यालयात, मोठया कंपन्यामध्ये कॅम्प घेण्यात येवून तसेच बीएलओ यांचेव्दारे आधार जोडणीचे काम सुरु आहे.
नागपूर जिल्हयातील सर्व मतदारांची आधार जोडणी झाल्यास निवडणूक प्रक्रियेतील बोगस वोटींग करण्याच्या प्रकारास आळा बसणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांची बैठक घेऊन आधार जोडणी करणेबाबत सहकार्य करण्याचे आवाहनही केले.