– मनपा मुख्यालयात अग्निशमन सेवा दिवस साजरा
नागपूर :- महापालिकेचे अग्निशमन दल नागपुरकारांसाठी सदैव तत्पर असते. हे सेवाकार्य अधिक बळकट करण्यासाठी यामध्ये लवकरच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करु, अशी ग्वाही मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अग्निशमन सेवा दिवसानिमित्त आज (ता.14) मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात दिली.
यावेळी मंचावर अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी., अजय चारठाणकर, उपायुक्त अशोक गराटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य अग्निश्मन अधिकारी बी.पी. चंदनखेडे उपस्थित होते.
यावेळी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम 1944 साली मुंबईत जहाजाला लागलेल्या भीषण घटनेतील 66 जवानांना अग्निशमन बचाव कार्य करताना प्राणाची आहुती देणारे शहीद गुलाबराव कावळे, शहीद प्रभू कुहीकर व शहीद रमेश ठाकरे या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी मनपा आयुक्तांना अग्निशमन विभागाद्वारे मानवंदना देण्यात आली. परेडचे निरीक्षण करून आयुक्तांनी अग्निशमन जवानांची मानवंदना स्वीकारली.
यावेळी बोलतांना डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, नागपूर शहराचा चौफेर विस्तार होत असताना नागपुरकरांच्या सुरक्षतेची जबाबदारी ही महापालिकेच्या अग्निशमन दलावर आहे. त्या दृष्टीकोनातून आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन तत्परतेने कर्तव्य बजावत असतात. केवळ शहरच नाही तर शहराबाहेर देखील आपल्या जवानांकडून मदत व बचाव कार्य केले जाते. पूर परिस्थिती असो किंवा आगीच्या घटना अशा सर्व ठिकाणी आपले अग्निशमन दलाचे जवान जनतेला संकटातून बाहेर काढण्याकरीता 24 तास कार्यरत असतात. शहराच्या लोकसंख्येनुसार महापालिकेचे 11 अग्निशमन केंद्र आहेत. येत्या काळात ही संख्या 22 वर जाणार आहे. पाचपावली येथील नवीन अग्निशमन केंद्राचे लोकार्पण लवकरच होणार असून जुने अग्निशमन केंद्रांचे नुतनीकरण देखील या वर्षात होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
अग्निशमन यंत्रणा आणि आपले जवान अद्यावत राहण्याकरीता त्यांना राष्ट्रीय अग्निशम महाविद्यालयाच्या मदतीने अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शहरातील गगनचुंबी इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता विभागाच्या ताफ्यात 70 मीटर उंच हायड्रोलिक प्लॅटफॉर्मचा समावेश केला जात असून लवकरच हे अत्याधुनिक वाहन नागपुरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याशिवाय विभागासाठी 14 अग्निशमन वाहने सेवेत दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना बोलतांना डॉ. चौधरी म्हणाले की, अग्निशमन दलातील जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जवानाकरीता विमा कवच देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच या वर्षात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले ‘मॉर्डन कंट्रोल रूम’ तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे आणि सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी तुषार बाहरहाते यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी आपत्कालीन घटनांवर नियंत्रण आणण्याचे प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी टॅक्टीकल मिडले ड्रील, टीटीएल ड्रील, ऑईल फायर ड्रील, व्हेरीयर ब्रँचेस व जेट डेमोस्टेशन ड्रील आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी पोहरे यांनी केले व आभार मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी मानले.
कोट्यावधींची मालमत्ता वाचविण्यात यश
2024-25 या वर्षात शहरात 808 आगीच्या घटना आणि 680 इतर दुर्घटनांची नोंद झाली असून आगीच्या घटनांमध्ये 24 कोटी 51 लक्ष 96 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले. मात्र विभागाच्या तत्परतेमुळे 71 कोटी 24 लक्ष 20 हजार 600 रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळाले आहे. तसेच शहराबाहेरील 39 आगीच्या घटनांमध्ये सेवा देत 16 कोटी 22 लक्ष 64 हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. मागील वर्षात अग्निशमन सेवेमार्फत एकूण 18 कोटी 25 लक्ष 75 हजार 896 रुपये विभागाला उत्पन्न प्राप्त झाले.