अखेर काँग्रेस पक्षाने भाकरी फिरवलीच. गेले अनेक दिवस विशेषतः विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर ही भाकरी फिरवली जाणारच याबाबत चर्चा सुरू होतीच. अपेक्षेनुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे पायउतार झाले आणि बुलढाणा जिल्ह्यातले एक तसे अनोळखी कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली गेली आहे.
काँग्रेस पक्ष हा एक अनाकलनीय पक्ष आहे असे म्हटले जाते. इथे कोणाला कोणते पद दिले जाईल आणि केव्हा कोणाची गच्छंती केली जाईल याची खात्री नसते. हा प्रकार आजचा नाही तर अगदी इंदिरा गांधींपासून सुरू आहे. मला आठवते सिमेंट घोटाळ्याच्या आरोपावरून तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले हे पायउतार झाले. त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याबाबत वेगवेगळी नावे चर्चेत होती. मात्र अचानक बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांचे नाव समोर आले. बाबासाहेब भोसले हे तसा विचार करता त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचे शर्यतीत कधीच नव्हते. मात्र अचानक त्यांचे नाव पुढे आले, आणि जवळजवळ वर्षभर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. बाबासाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी माझ्या आठवणीनुसार आर. के. लक्ष्मण यांचे एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यात इंदिरा गांधींसमोर पाच-पन्नास कार्यकर्ते उभे आहेत, आणि त्यातल्या कोण्या तरी एकाकडे बोट दाखवून इंदिरा गांधी म्हणत आहेत की तू तूच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. हो…. ज्याला ती जबाबदारी दिली तोही आश्चर्यचकित होऊन बघतो आहे, आणि बाकी सर्व कार्यकर्तेही अवाक झालेले दिसत आहेत. आजही काँग्रेसमध्ये तीच परिस्थिती आहे. फक्त आता निर्णय इंदिरा गांधी घेत नसून त्यांचा नातू राहुल गांधी हे घेत आहेत.
नाना पटोले हे तसे मूळचे काँग्रेसीच, मात्र २००८ मध्ये त्यांनी धानाला भाव देण्याच्या मुद्द्यावरून आमदारकीचा राजीनामा दिला. पुढे ते काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून लोकसभा लढले, आणि नंतर थोड्याच दिवसात ते भाजपवासी झाले. भाजपमध्ये ५ वर्ष आमदार म्हणून राहिल्यावर ते २०१४ मध्ये लोकसभेत गेले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पंगा घेतल्यामुळे ते अडचणीत आले, आणि २०१८ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते पुन्हा एकदा काँग्रेसवासी झाले आहेत. नाना काहीसे आक्रमक स्वभावाचे, त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष म्हणून यशस्वी होतील असे वाटत होते. मात्र त्यांचा अति आक्रमक स्वभाव आणि ज्येष्ठांना सोबत घेऊन न चालण्याची प्रवृत्ती यामुळे ते अडचणीत आले. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जो जबर फटका बसला, त्याचे बिल सहाजिकच नानांच्या नावे फाडले गेले. १९७२ मध्ये विधानसभेत भाजपचे २२२ आमदार होते. आता नानांच्या काळात ती संख्या सोळावर आली होती. मात्र निवडणुकीआधी नाना मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघत होते. हाच त्यांचा काहीसा एककल्ली आणि अति महत्त्वाकांक्षी स्वभाव त्यांना नडला. परिणामी सर्वच आघाड्यांवर ते पराभूत झाले. त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाची ही दाणादाण झाली.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचे बिल जेव्हा नानांच्या नावे फाडले गेले, तेव्हा त्यांनी आपला राजीनामा सादर केला होता. मात्र नवा प्रदेशाध्यक्ष कोण हे ठरत नव्हते. दरम्यान नानांना विधानसभेत काँग्रेसचे गटनेते पद हवे होते. त्यासाठी ते प्रयत्नशील होते अशी चर्चा होती. मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांना पुरतीच धोबीपछाड दिली. दरम्यान पक्ष नेतृत्व प्रदेशाध्यक्षपदी कोणाला बसवावे या शोधात पक्षश्रेष्ठी होते. मात्र सध्याची पक्षाची दयनीय स्थिती बघता कोणीच ती जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. प्रदेशाध्यक्ष पदासाठी विश्वजीत कदम, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार , अमित देशमुख, यशोमती ठाकुर, यांची नावे चालू होती मात्र यांच्यापैकी कोणीच सद्यस्थितीत पक्षाध्यक्षपदाचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायला तयार नव्हते अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती होती. त्याला कारणेही तशीच आहेत. आज पक्षाला पुन्हा उभे करायचे तर पक्षात नवे चैतन्य ओतावे लागणार आहे. आज पक्षाजवळ केंद्रात आणि राज्यातही सत्ता नाही. सत्ता नसल्यामुळे पैसाही नाही. पूर्ण राज्यात पक्षाचा कारभार चालवायचा तर पैसा उभा करावा लागणारच. कारण प्रदेशाध्यक्ष म्हंटला की संपूर्ण राज्यात दौरे करावे लागतात. महिन्यातून आठवडाभर तरी दिल्लीत मुक्काम ठोकावा लागतो. त्यासाठी पैसा हा लागतोच. हा पैसा उभा करणे ही जबाबदारी प्रदेशाध्यक्षांवरच येते. त्यातही पक्षातील जुने जे दिग्गज नेते आहेत, ते कितपत सहकार्य देतील याची खात्री नसते. शिवाय आज पक्षात आमदार आणि खासदारही कमी आहेत. त्यांच्यामार्फतही फारसा पैसा उभा होऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीत कारभार कसा चालवणार हा प्रश्न येतोच. त्यामुळेच कोणी हे लोढणे गळ्यात अडकवून घ्यायला तयार नव्हते.
आज महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षात पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड असे अनेक दिग्गज आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हटला की या मोठ्या नेत्यांचा योग्य तो आदर राखून आणि प्रसंगी त्यांचा कुरवाळून त्यांना कामाला लावावे लागते. आज प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत ज्यांची नावे घेतली जात होती ते कोणीही या भानगडीत पडायला तयार नव्हते. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाची गोची झाली होती.
त्यामुळेच शोधत शोधत शेवटी पक्षश्रेष्ठींना हर्षवर्धन सपकाळ हे नाव सापडले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत. ते काही काळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. तर ५ वर्ष विधानसभेत आमदार म्हणूनही ते कार्यरत राहिले आहेत. बुलढाण्यातले खासदार मुकुल वासनिक यांचे ते निकटवर्ती असल्यामुळे पक्ष नेतृत्वाशीही त्यांची जवळीक आहे. परिणामी त्यांना महाराष्ट्र बाहेरच प्रभारी म्हणून वेगवेगळ्या राज्यात पाठवले गेले आहे. महाराष्ट्रात त्यांचा फारसा संपर्क राहिलेला नाही. तरीही त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आज त्यांच्यासमोर राज्यातील तळागाळातल्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षबांधणी करण्याचे आव्हान उभे आहे. आज गेली ११ वर्षे पक्षाची केंद्रात सत्ता नाही. त्याचबरोबर राज्यातही सत्ता नाही. नाही म्हणायला २०१९ ते २०२२ या काळात सत्तेचा थोडा तरी वाटा त्यांना मिळाला होता. मात्र तिथे त्यांच्यावर शरद पवारांचा अंकुश होता. पवारांनी काँग्रेस पक्षाची बांधणी होऊच दिली नाही, हे चित्र स्पष्ट दिसत होते. २०१९ मध्ये महाआघाडीची सत्ता आल्यावर माझ्या आठवणीनुसार २०१९ मध्येच विधानसभा अध्यक्ष झालेले नाना पटोले हे २०२१ मध्ये प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष होऊ नये म्हणून पवारांनी अध्यक्षाची निवडणूकच होऊ दिली नव्हती. त्या महाआघाडी सरकारमध्ये सर्व मलईदार खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस कडेच होती. त्यानंतर शिवसेनेने हात मारला होता. काँग्रेसच्या वाट्याला उरला सुरला गाळ आला होता. त्याचा पक्ष बांधण्यासाठी फारसा फायदा नव्हताच. या सर्व प्रकारामुळे एकूणच पक्ष विस्कळीत झालेला आहे. त्याची पुनर्बांधणी करायची तर आज कंबर कसून कामाला लागावे लागणार आहे. त्यासाठी पैसा उभा करावा लागणार आहे. ज्येष्ठ कितपत सहकार्य करतात त्यावर हर्षवर्धन सपकाळ पक्ष नव्याने उभा कसा करू शकतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आज नाना पटोले यांच्या काळात पक्षाची पूरती वाट लागली आहे. सपकाळ त्याला किती सावरू शकतात आणि लगेचच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाला कितपत यश मिळवून देऊ शकतात याच्यावर त्यांचे नेतृत्व किती स्वीकारले गेले हे स्पष्ट होणार आहे. एकूणच त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा कस लागणार आहे हे निश्चित.
काहीही असले तरी हर्षवर्धन सपकाळ आज साठीच्या आतले नेते आहेत. त्यामुळे ते एक प्रगल्भ नेते म्हणूनच त्यांच्याकडे बघितले जाणार आहे. अशा स्थितीत ते पक्षाचा गाडा कसा ओढतात त्यावर त्यांचे यशापयश ठरणार आहे. त्यासाठी त्यांना दैनिक बित्तमबातमीच्या हार्दिक शुभेच्छा.
– अविनाश पाठक