– उत्पादनात 19% वाढ; आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1,681 रेल्वे इंजिन निर्मिती जी आर्थिक वर्ष 2023-24 मधील 1,472 पेक्षा 209 अधिक
– ‘मेक इन इंडिया’मुळे वृद्धी: गेल्या 10 वर्षांत रेल्वे इंजिन उत्पादन वाढून 9,168 वर पोहोचले, वार्षिक सरासरी दुप्पट होत पोहोचली 917 वर
नवी दिल्ली :- 2024-25 या आर्थिक वर्षात 1,681 लोकोमोटिव्ह अर्थात रेल्वे इंजिनांचे विक्रमी उत्पादन करून भारताने रेल्वे लोकोमोटिव्ह उत्पादनात जागतिक आघाडीवर स्थान मिळवले आहे. हा टप्पा अमेरिका, युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या प्रदेशांच्या एकूण लोकोमोटिव्ह उत्पादनापेक्षा जास्त आहे, ज्यामुळे जागतिक रेल्वे क्षेत्रात भारताचे वाढते वर्चस्व पुन्हा सिद्ध होते.
भारतीय रेल्वेच्या लोकोमोटिव्ह उत्पादन युनिट्सनी 2024-25 या आर्थिक वर्षात विविध श्रेणींमध्ये 1,681 इंजिनांचे उत्पादन करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या 1,472 रेल्वे इंजिनाच्या तुलनेत ही वाढ 209 म्हणजेच 19% आहे. देशातील लोकोमोटिव्ह उत्पादनातील हे विक्रमी उत्पादन आतापर्यंतचे सर्वाधिक आहे, जे रेल्वे पायाभूत सुविधा आणि क्षमता वाढविण्यातील सर्व युनिट्सच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे द्योतक आहे.
रेल्वे इंजिनाच्या उत्पादनातील सातत्यपूर्ण वाढ म्हणजे “मेक इन इंडिया” उपक्रमाला बळकटी देण्यासाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा थेट परिणाम होय. 2004 ते 2014 दरम्यान, भारताने एकूण 4,695 रेल्वे इंजिनांचे उत्पादन केले, ज्याची राष्ट्रीय वार्षिक सरासरी 470 होती. याउलट, 2014 ते 2024 पर्यंत, रेल्वे इंजिन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन 9,168 रेल्वे इंजिनांचे उत्पादन झाले, ज्यामुळे वार्षिक सरासरी अंदाजे 917 झाली.
2024-25 या आर्थिक वर्षात, भारतीय रेल्वेने त्यांच्या उत्पादन युनिट्समध्ये 1,681 लोकोमोटिव्हचे विक्रमी उत्पादन केले. उत्पादनाची विभागणी याप्रमाणे: चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सने 700 लोकोमोटिव्हचे उत्पादन केले, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्सने 477 लोकोमोटिव्हचे उत्पादन केले, पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्सने 304 लोकोमोटिव्हचे योगदान दिले आणि मधेपुरा आणि मारहोवडा युनिट्समध्ये प्रत्येकी 100 लोकोमोटिव्हचे उत्पादन केले गेले.
देशात उत्पादित होणारी बहुतेक रेल्वे इंजिने ही मालवाहू गाड्यांसाठी असतात. 2024-25 या आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या 1,681 रेल्वे इंजिनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
WAG-9/9H लोकोमोटिव्ह: 1,047
WAG-9HH लोकोमोटिव्ह: 7
WAG-9 ट्वीन लोकोमोटिव्ह: 148
WAP-5 लोकोमोटिव्ह: 2
WAP-7 लोकोमोटिव्ह: 272
NRC लोकोमोटिव्ह: 5
WAG-12B लोकोमोटिव्ह: 100
WDG 4G/6G लोकोमोटिव्ह: 100