– एक जन्मठेपेची शिक्षा भोगतेय् दुसरी न्यायाधीन बंदी
-जगण्याचे बळ अन् जीवनाचा अर्थ केवळ तुझ्यामुळेच
नागपूर :-आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुझा जन्म. तू माझ्यासाठी खुप भाग्यवान आहेस. तुझ्यामुळेच कळला जगण्याचा अर्थ. तुझ्यामुळेच मिळाले जगण्याचे बळ, जगण्याची नवी उमेद. आजचा दिवस म्हणजे एक सण, उत्सव. बाळा तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो, हीच एक देवाकडे प्रार्थना! ही वाक्ये आहेत कारागृहातील एका मातेची, तिच्या नवजात बाळाच्या नामकरण सोहळ्यातील.
कुटुंबात नवीन पाहुणा येणार असला की घरात आनंदाचे वातावरण असते. अगदी त्याचप्रमाणे तो येणार म्हणून कारागृहातही आनंदी वातावरण होते. त्याच्या आगमनाची प्रतीक्षा सार्यांनाच होती. ती संपली अन् नोव्हेंबरमध्ये त्या मातेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पाच दिवसाच्या अंतराने दुसर्याही एका मातेची मेडिकल रुग्णालयात प्रसूती झाली. तिच्या पोटीही एक गोंडस बाळ जन्माला आले. दोन बाळांच्या आगमनाने कारागृहात किलबिल सुरू झाली. घराघरात बाळांच्या रडण्याचा आवाज येतो, तद्वतच कारागृहातही रडण्याचे स्वर कानी पडायला लागले.
आता प्रत्येकाला प्रतीक्षा होती त्या दोन नवजात बालकांच्या नामकरणाची. कारागृहाच्या उपअधीक्षक दीपा आगे यांनी घरातील प्रमुख व्यक्तीप्रमाणे कार्यक्रमासाठी जुळवाजुळव केली. निमंत्रण देण्यापासून तर नामकरणाची व्यवस्था करण्यापर्यंत. पाळणा, नवीन कपडे, केक, फुगे, खेळणी. लहान मुलांसाठी गाणीही. थाटात नामकरण सोहळा पार पडला. कारागृहातील शंभरावर महिला या सोहळ्याला उपस्थित होत्या. तशी तर त्यांच्या चेहर्यावर निराशा जाणवते. परंतु नामकरण सोहळ्यामुळे अनेकांचे चेहरे प्रफुल्लीत झाले. यानिमित्ताने अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मात्र, त्या मातांच्या चेहर्यावर आनंदाश्रू तरळत होते. तुझ्यामुळेच जगण्याची नवी उमेद मिळाली, अशाच जणू त्या सांगत असाव्या.
नामकरण सोहळ्याला कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, कारागृहाच्या उपअधीक्षक दीपा आगे, पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा पांडे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संगीता तिवारी, तुरुंग अधिकारी (महिला) माया धतुरे, सांबाच्या शाखा अभियंता विद्या लांजेवार, माउंट कार्मेल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सत्या, लवीना आणि मारिया उपस्थित होत्या.
नोव्हेंबरमध्ये झाली प्रसूती
पहिली महिला जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कोरोना बंदीवानांना तात्पुरत्या रजेवर सोडण्यात आले होते. रजेवरून परत आलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी केली जाते. तपासणीत ती गर्भवती असल्याचे कळले. त्या दिवसापासून तिची काळजी आणि उपचार सुरू झाले. नोव्हेंबर 2022 मध्ये तिने गोंडस बाळाला जन्म दिला. दुसरी महिला न्यायाधीन बंदी आहे. पाच महिन्यांपूर्वी ती कारागृहात आली. नोव्हेंबर महिन्यात तिचीही प्रसूती झाली. दोघींच्याही बाळांचा नामकरण सोहळा कारागृहात पार पडला.
– दीपा आगे, कारागृह उपअधीक्षक
@ फाईल फोटो