खासदार क्रीडा महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर :- खेळाच्या माध्यमातून आज आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांचे खेळाडू देशाचे नाव लौकीक करीत आहेत. खेळाडूंची कामगिरी ही छोट्या छोट्या भागामध्ये उराशी स्वप्न बाळगून खेळणा-या क्रीडापटूंसाठी प्रेरणादायी असते. अशा उदयोन्मुख खेळाडूंसाठी खासदार क्रीडा महोत्सवासारखे आयोजन हे एक पर्वणी ठरते. खेळाडूंच्या प्रगतीसाठी अशा क्रीडा महोत्सवांचे आयोजन ही मोठी गरज आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता देवदत्त नागे यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून नवीन वर्षात होणा-या ५व्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या अनुषंगाने महोत्सवाच्या कार्यालयाचे शुक्रवारी (ता.९) अभिनेता देवदत्त नागे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
सीताबर्डी येथील ग्लोकल स्क्वेअर मॉलमधील खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा नागपूर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, सुधीर दिवे, माजी आमदार सुधाकर कोहळे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी आदी उपस्थित होते.
जय मल्हार या टिव्ही मालिकेसोबतच तानाजी, ब्रम्हास्त्र या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेते देवदत्त नागे यांनी यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाची पार्शभूमी समजून घेतली. महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी त्यांना महोत्सवाच्या आयोजनासंबंधीची संपूर्ण माहिती दिली. खेळ आणि खेळाडूंचा विकास हे त्यांना मिळणा-या आवश्यक सुविधांमुळे होतोच शिवाय त्यांच्यासाठी स्थानिक स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन होत असल्यास त्यांना नवे व्यासपीठ उपलब्ध होते. खेळाडूंना मिळणा-या अशा व्यासपीठांमुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणा होउन त्यांचा आत्मविश्वास बळावतो व पुढे हेच खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचा आणि देशाचा मान वाढवितात, असेही अभिनेता देवदत्त नागे म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे पीयूष आंबुलकर, डॉ. पद्माकर चारमोडे, आशिष मुकिम, अश्फाक शेख, सचिन देशमुख, डॉ. विवेक अवसरे, प्रकाश चांद्रायण, सतीश वडे, लक्ष्मीकांत किरपाने, सुनील मानेकर, सचिन माथने, विनय उपासनी, विशाल लोखडे, संदेश खरे, सौरभ मोहोड आदींनी सहकार्य केले.