– डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे व्याख्यान
नागपूर :- भारतीय संविधानाने समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असला तरी दलित- आदिवासी समाजाबाबत अजूनही भेदभाव दिसून येत आहे. त्यांच्या समस्या वेगळ्या असल्याने सर्वांसाठी सामान धोरण राबविणे योग्य नाही. म्हणूनच दलित -आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी प्रत्येक क्षेत्राकरिता नवीन कायदा आणावा लागेल, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन महाराज बाग येथील दीक्षांत सभागृहात गुरुवार, दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. थोरात बोलत होते. माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान मानव्य विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी भूषविले तर अध्यासन प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले उपस्थित होते.
‘महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची आर्थिक व सामाजिक स्थिती : उभरत्या प्रश्नांचे विश्लेषण’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. सुखदेव थोरात यांनी स्थावर संपत्ती, उद्योगधंदा, शिक्षण या आधारे दलित व आदिवासी समाज देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील भेदभाव अनुभवत असल्याचे सांगितले. आरक्षणामुळे सरकारी नोकरी व शिक्षणामध्ये दलित व आदिवासी समाज काही प्रमाणात पुढे आला असला तरी सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने भेदभावाला तोंड देत आहे. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शेती, उद्योगधंदे, उत्पन्नाची साधने त्यांच्याकडे नसल्याने या समाजातील बहुतांश नागरिकांना दैनंदिन मजूर म्हणून कामे करावी लागत आहे. या कारणाने मागासवर्गीय समाजातील नागरिकांचा आर्थिक विकास सरकारी धोरणे असताना देखील अपेक्षेप्रमाणे झाला नाही. सोबतच सामाजिक भेदभाव होत असल्याचे त्यांनी जातीनिहाय जनगणनेच्या सरकारी आकडेवारीच्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे समजावून सांगितले. नोकरी शेती उद्योग धार्मिक आर्थिक भेदभाव होत असल्याने मागासवर्गीय समाजामध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. एवढेच नव्हे तर उत्पादन विक्री सोबतच खाजगी क्षेत्रात देखील मागासवर्गीयांना भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याने वेगाने असमानता निर्माण झाल्याचे डॉ. थोरात म्हणाले. लोकसंख्येच्या हिशोबाने आरक्षण दिले असले तरी खाजगीकरण होत असल्याने ते हिरावले जात आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात नव्याने धोरण ठरविण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली. जातीनिहाय जनगणना केली तर समाजाचे खरे चित्र स्पष्ट होईल व त्यावर उपाययोजना आखता येईल.
व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांनी आयोजनामागील भूमिका मांडली व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. व्याख्यानमालेचे अध्यक्षीय भाषण करताना अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी डॉक्टर थोरात यांनी उपलब्ध करून दिलेला डाटा संशोधकांकरिता अत्यंत उपयोगी असल्याचे सांगितले. डॉ. थोरात यांनी सर्व घटकांवर चिंतन- मंथन केले असून त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. आधुनिक कालखंडात विचार करण्याची स्थिती निर्माण झाली असून पुन्हा सिंहलोकन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन विजयकांत पाणबुडे यांनी केले तर आभार कल्पना मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राधिकारणी सदस्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.