लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 ते 350 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवली गेली होती. पण आता भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे 10 वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा इतर पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400 पार करण्याचा नारा देणाऱ्या भाजपला यावेळी पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाहीये.
राम मंदिराचा मुद्यावर मतदान नाही
भाजपकडे राम मंदिर हा या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा होता. पण या मुद्दयावर त्यांना मते मिळालेली दिसत नाहीयेत. भाजपने राम मंदिरावरुन जोरदार वातावरण निर्माण केले होते. प्रत्येक भाषणात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. पण उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी देखील ही आत्मचिंतनाची निवडणूक ठरली आहे. कारण अयोध्येतच भाजपचा मोठा पराभव झाला आहे.
फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचे लल्लू सिंह यांचा सपाचे अवधेश प्रसाद यांनी पराभव केलाय. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात अयोध्या येते. या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हा संपूर्ण सोहळा पार पडला. परंतू लोकसभा निवडणुकीत याचा फायदा मिळवण्यात भाजप अपयशी ठरली. विरोधी पक्षांनी राम मंदिराच्या या सोहळ्याला भाजपचा कार्यक्रमाला म्हणत स्वतःला दूर केले होते.