– तंत्रज्ञानाच्या सहायाने डाटा संकलन पद्धती विकसित कराव्यात – अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा
मुंबई :- विकासाच्या विविध योजना राबविताना डाटा संकलन आणि विश्लेषणाच्या नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पद्मविभूषण प्रा. प्रशांत महानलोबीस यांच्या जन्म दिनानिमित्त नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे १८ व्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालनालयाचे संचालक डॉ. जितेंद्र चौधरी, अपर संचालक (समन्वय) कृष्णा फिरके, उपसचिव दिनेश वाघ, भारतीय प्रौद्योगिक संस्थानचे सहायक प्राध्यापक परमेश्वर उदमले आदींसह संचालनालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. देवरा म्हणाले की, प्रा. प्रशांत महानलोबीस यांनी जी सांख्यिकीची पद्धत सुरू केली त्याचा आजही आपल्याला चांगला उपयोग होत आहे. या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास करून नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्याने आपण त्यांचा वापर करत असताना एक नवीन डेटा तयार करीत असतो. पण तोच डेटा अचूक करण्यासाठीच्या पद्धतीचा अभ्यास करून त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे.
डॉ. चौधरी म्हणाले की, सांख्यिकी माहिती नव युवकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. योजना राबविताना सांख्यिकीची अत्यंत आवश्यकता आहे. या वर्षीच्या सांख्यिकी दिनाची संकल्पना “विदा” (Use of Data for decision making ) अशी ठरविली आहे.
प्रा. उदमले यांनी ग्रामीण भागासाठी विविध कामांच्या डेटा संकलनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पर्यायाबाबत माहिती दिली. सांख्यिकीय माहितीवर आधारित महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी २०२३, राज्यातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक, पायाभूत सुविधा सांख्यिकी २०२१-२२ आणि २०२२-२३,शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष अहवाल २०२३, महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा २०१९-२०, राज्य शाश्वत विकास ध्येये प्रगती अहवाल २०२२-२३, शाश्वत विकास ध्येये कॉमिक, न्यू सीरीज ऑन स्टेट डोमेस्टिक प्रॉड्यक्ट ऑफ महाराष्ट्र, डीस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऑफ महाराष्ट्र, ॲनालिसिस ऑफ स्टेट बजेट ऑफ महाराष्ट्र, इस्टिमेट ऑफ ग्रोस फिक्स्ड, कॅपिटल फॉर्मेशन, वार्षिक उद्योग पाहणी अहवाल २०२०-२१ या प्रकाशनांचे विमोचन यावेळी करण्यात आले.