संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी येथील राष्ट्रीय सेवा योजना युनिट तसेच जीएसके ब्लड बँक आणि कंपोनंट्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २/८/२०२४ ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदानाबद्दल जागरूकता वाढवणे आणि रक्तदानाशी संबंधित मिथके दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रा. राधेश्याम लोहिया, रासेयो समन्वयक डॉ मयुर काळे, आणि महाविद्यालयीन वरिष्ठ प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रा. राधेश्याम लोहिया यांनी रासेयो चमूला अशा उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि यापुढेही असे उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रेरणा दिली.
याप्रसंगी रक्तपेढी चमूचे वैद्यकीय संचालक डॉ. आशिष खंडेलवाल यांनी रक्तदानाची तातडीची गरज व त्याचे फायदे याबाबतीत उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. रक्ततुटवडीच्या समस्यांशी सामना करण्यासाठी तातडीने कृती करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
या शिबिरात १२६ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी रक्तदात्यांनी उत्साहाने भाग घेतला.
श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी येथे झालेल्या रक्तदान शिबिराने रक्तदानाचे महत्त्व आणि त्याचे फायदे अधोरेखित केले तसेच समाजाची सेवा करण्याची भावना आणि जबाबदारी वाढवण्याचा प्रयत्न केला असे कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी प्रतिपादन केले.
रासेयो समन्वयक डॉ मयुर काळे तसेच सहा. समन्वयक सुप्रिया शिधये यांनी सर्व रक्तदात्यांच्या उत्साहपूर्ण सहभागातून कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता “रक्त कुणाची तरी आशा आहे, रक्तदान करा… जीवन वाचवा” या संकल्पाने झाली.