नागपूर :- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या अधीन नागपूरच्या नवीन सचिवालय भवन येथील विणकर सेवा केंद्राच्या वतीने 9 व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र धवळे यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक एस. पी . ठुबरीकर यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त केलेल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण सुद्धा येथे दाखवण्यात आले. हातमाग क्षेत्रात ज्यांनी उत्कृष्ठ काम केलेले आहे अशा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृती चिन्ह देवून सत्कारही करण्यात आला.
इंडिया हँडलूम ब्रँड, विणकर मित्र मदत केंद्र, विणकर मुद्रा योजना, विणकरांची ऑनबोर्डिंग नोंदणी, समर्थ प्रशिक्षण कार्यक्रम आणि संबंधित कामात काम करणाऱ्या विणकरांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती ठुब्रीकर यांनी यावेळी दिलीनागपूर सोबतच वाशिम येथे देखील अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विणकर सेवा केंद्र त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ यांची हातमाग उत्पादने प्रदर्शन करता उपलब्ध राहणार आहेत .
या कार्यक्रमाचे संचालन विणकर सेवा केंद्र नागपूरचे सहायक संचालक महादेव व्ही पौनीकर यांनी केले तर पुनीत पाठक, तांत्रिक अधीक्षक यांनी आभार प्रदर्शन केले.