यवतमाळ :- दरवर्षी २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. यवतमाळ डाक विभाग यावर्षी हा दिवस एक वेगळा उपक्रम राबवून साजरा करीत आहे.
बेटी बचाव – बेटी पढाव या ध्येयाला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. बचतीची एक सुयोग्य योजना म्हणून मुलींच्या पालकांनी याला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. राष्ट्रीय बालिका दिनाचे निमित्ताने यवतमाळ डाक विभागातर्फे ही योजना जास्तीत जास्त बालिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत 0 ते 10 वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्ह्यातील डाक कर्मचारी शाळा, अंगणवाडी तसेच घरोघरी जाऊन या योजनेची माहिती देत आहेत. मुलींच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी ‘सुकन्या समृद्धी खाते’ हा एक महत्त्वाचा उपक्रम असून पालकांनी आपल्या मुलीचे खाते उघडून त्यांच्या भविष्यासाठी भरीव पाऊल उचलावे, असे आवाहन अधीक्षक डाकघर गजेंद्र जाधव यांनी केले आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मुलींच्या शिक्षण व आर्थिक सक्षमीकरणासाठी जागरूकता निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे. बालिका दीन साजरा करतांना पालकांनी आपल्या मुलीच्या स्वप्नाला बळकट पंख देण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिंनानीमित्य २४ जानेवारी रोजी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.