– इतवारी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास
नागपूर :- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर क्षेत्रातील अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 15 स्टेशनपैकी 3 स्टेशनचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 12 स्थानकाचे काम वेगाने पूर्ण केल्या जात आहे. यात प्रामुख्याने नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचे नामकरण सोहळा कार्यक्रम सकाळी 10.30 वाजता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आभासी पध्दतीने दुपारी 12.30 वाजता होणार असल्याची दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या महाव्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी पत्रपरिषदेत दिली. इतवारी स्थानकावर याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे व अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाच्या विकासकामांसाठी 12.39 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यात प्रामुख्याने स्थानकाची नवीन इमारत, उद्यान, वाहनांसाठी पार्किंग, सर्वत्र सीसीटीव्ही, हायमास्ट, स्वच्छ शौचालय आणि परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
इतवारी रेल्वेस्थानकावर प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न असून त्याद़ृष्टीने विकास कामे केल्या जात आहे. प्रशस्त आणि आरामदायक वेटिंग हॉल, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एस्किलेटरसह अन्य सुविधांचाही यात समावेश आहे.
सिटी सेंटरची संकल्पना शहराच्या गजबजलेल्या भागात असलेल्या या रेल्वे स्थानकाला दोन्ही बाजूने जोडून सिटी सेंटर सारखे विकसित करण्याची योजना आहे. त्यामुळे या परिसरात प्रवाशांसोबत अन्य नागरिकांची गर्दी वाढून त्या भागातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होईल.
रेल्वे मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत सर्वच स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास होत आहे. नागपूर विभागातील 64 आरओबी, आरयुबीच्या कामाचा यात समावेश आहे.