जगाच्या नकाशावर तीन दिवस नागपूरची धमाल 

नागपुरात सी-20 चे नेटके आयोजन ; शहरासाठी संस्मरणीय अनुभव

नागपूर :- एखाद्या उत्तम आयोजनासाठी अनेक यंत्रणांमध्ये समन्वय हवा असतो, सोबतीला हवे असते सामान्य नागरिकांचे पाठबळ. जागतिक दर्जाच्या सी-20 परिषदेला शहारातील उत्साही तरुणाईने तीन दिवस नागपूरला असेच जगाच्या नकाशावर झळकत ठेवले .

जागतिक स्तरावर मानाच्या जी-20 परिषदेअंतर्गत नागपुरात 20 ते 22 मार्च 2023 दरम्यान आयोजित सिव्हिल-20 अर्थात सी-20 परिषदेच्या आयोजनासाठी नागरी संस्थांच्या खांद्याला खांदा लावून प्रशासनाने एकदिलाने काम केले. नागरी संस्था, प्रशासन व शहरातील सर्व घटकांनी एकत्रित काम केल्यामुळे एकजुटीचा परिणाम म्हणून या जागतिक स्तरावरील आयोजनासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा निर्माण झाल्या. शहरात पायाभूत सुविधा अधिक बळकट झाल्या. ठिकठिकाणी सुशोभिकरणाची कामे झाली. रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजकांवर वृक्ष लागवड, संरक्षक भिंतींवरील आकर्षक व संदेश देणारी चित्रे, ठिकठिकाणी शहराच्या गौरवशाली परंपरेची माहिती देणारे फलक यामुळे परिषदेसाठी उत्तम वातावरण निर्मिती झाली.

जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात माहिती व जनसंपर्क कार्यालय तसेच महानगरपालिकेने या काळात नागपूर शहर व जिल्ह्याच्या सर्व उपलब्धीला विविध प्रचार आयुधांच्या माध्यमातून शहरात झळकाविले. यासाठी शहराच्या प्रथा, परंपरा, ऐतिहासिक वास्तू ,पायाभूत सुविधांची उपलब्धी सर्वच प्रसार माध्यमात प्रकाशित होईल यासाठी प्रयत्न केले .

या सर्व नेटक्या आयोजनामध्ये शहराच्या तरुणाईने देखील आपली ‘स्पेस ‘ शोधून काढली. समाज माध्यमांवर शहरातील सजावटींची हजारो छायाचित्रे या तीन दिवसात झळकत होती. संपूर्ण शहर रात्री उशिरापर्यंत विमानतळ, वर्धा रोड, सिव्हिल लाईन्स या परिसरात आनंद साजरा करीत होते. या काळात सोशल मीडियावर झळकलेले छायाचित्र नागपुरात नेमके काय चालू आहे, याचा अंदाज जगभराला देत होते. त्यामुळे या तीन दिवसात समाज माध्यमांच्या सर्व आयुधांवर नागपूरकरच स्वार होते. तरूणांनी रोषणाई व शहराचे सौदर्यं मोबाईलमध्ये कैद करुन समाजमाध्यमांवर छायाचित्रे, व्हिडिओ, रिल अपलोड करत नागपूर शहराला देश-विदेशात पोहचविले.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने उत्तम नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन शहराच्यादृष्टीने अत्यंत मानाचे व प्रतिष्ठेचे हे आयोजन नेटके व यशस्वीरित्या पार पाडले. स्थानिक प्रशासनाची धुरा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांभाळत जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नागपूर सुधार प्रन्यास, पोलीस प्रशासन, वनविभाग, मेट्रो आणि विमानतळ आदी प्रशासन व्यवस्थेची योग्य सांगड घालून विविध आघाड्यांवर सरस कामगिरी केली. शहरातील रस्त्यांवर सिंथेटिक पॅचेस, संरक्षक भिंतींवर आकर्षक व कलात्मक चित्र रेखाटन, रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजकावर वृक्ष लागवड आदी सौंदर्यीकरणाची कामे महानगरपालिकेने वेळेत पूर्ण केली.

या आयोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाच्या विविध समित्या स्थापन झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समित्यांनी देश-विदेशातील पाहुण्यांच्या आगमनापासून प्रस्थानापर्यंत राजशिष्टाचार सांभाळत शहरातील त्यांचे वास्तव्य सुखकर केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी शालेय शिक्षण विभागाला सूचना करुन शालेय स्तरापासून सी-20 परिषदेच्या आयोजनाबाबत जनजागृतीसाठी विविध मोहीमा राबविल्या. नागपूर मेट्रोनेही विमानतळापासून छत्रपती चौक मेट्रोस्टेशन दरम्यानच्या परिसरात आकर्षक देखावे लावून महाराष्ट्र व विदर्भाची गौरवशाली परंपरा मांडली. सी-20 परिषदेनंतरही आता शहराच्या वैभवात हे सुंदर देखावे कायम भर घालतील.

नागपूर शहराची वेगळी ओळख असलेला फुटाळा तलाव येथील भव्य संगीतकारंज्याच्या कार्यक्रमाची खास मेजवानी या पाहुण्यांना देण्यात आली. याच ठिकाणी फटाक्यांची रोमहर्षक आतषबाजी करण्यात आली. तेलनखेडी गार्डन येथे या पाहुण्यांना विदर्भ, महाराष्ट्र व भारत देशातील खाद्य पदार्थांची व महाराष्ट्रातील समृद्ध लोककलांची ओळख पटवून देण्यात आली. या सर्व आयोजनाची जबाबदारी सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यासने पार पाडली. पेंच व्याघ्र प्रकल्पात या पाहुण्यांना येथील वाघ आणि वन्य जीवांचे दर्शन घडविण्यासाठी क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी यांच्या नेतृत्वात विशेष जंगल सफारी आयोजित करण्यात आली. देवलापार गोविज्ञान संशोधन केंद्रासही या पाहुण्यांनी भेट दिली. या सर्व आयोजनात अतपासून- इतिपर्यंत सुरक्षेची चोख जबाबदारी शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या नेतृत्वात पार पडली .

या आयोजनासाठी प्रशासन घेत असलेल्या विविध महत्वपूर्ण निर्णयांची माहिती आणि परिषदेबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विशेष प्रसिद्धी मोहिम राबविली. समाज माध्यम, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी आदी माध्यमांवरुन ही प्रसिद्धी मोहिम पार पडली. नागपूर व विदर्भातील वनसंपदा, संस्कृती, गौरवशाली परंपरा आदी विषयांवर छायाचित्र स्पर्धा आणि छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन माहिती संचालनालयाने केले. 

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ज्या गतीने आणि कल्पकतेने शहर सजविले त्यासाठी ते वेगळ्या धन्यवादास पात्र ठरतात. विशेषतः विद्युत विभाग व बागकाम विभाग यांची मेहनत ठिकठिकाणी दिसून आली. सी-20 च्या आयोजनासाठी शहराला उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते. आयोजन काळात शहरातील महत्वाच्या भागांमध्ये करण्यात आलेल्या आकर्षक व कल्पक रोषणाईची भुरळ नागपुरकरांना पडली. मुख्य रस्त्यांवर भल्या मोठ्या आकारांचे लाईट्स बलून, ग्लोसाईन बोर्ड, एलईडी दिव्यांची फुलपाखरे, डेकोरटिव्ह पोल लाईट्स्, रस्त्याच्या दुतर्फा झाडांवर लावण्यात आलेले मोठ्या आकारांचे कंदिल लावण्यात आले. ठिक-ठिकाणी परगोला, फाउंटेन, एलईडी लाईटिंग, लेजर रोषणाई करण्यात आली. या सर्वांमुळे शहरात दिवाळीसदृष्य वातावरण निर्माण झाले होते.

नागपूर शहराला सामाजिक क्रांती, चळवळी, राष्ट्रप्रेमाची भावना सर्वदूर पसरविणाऱ्या संस्थांची वैभवशाली परंपरा आहे. यासोबतच समृद्ध वैचारिक परंपरा लाभलेल्या या शहराला सी-20 च्या प्रारंभिक परिषदेच्या आयोजनाची संधी लाभली. येथील प्रशासन व जनतेच्या सहकार्याने या संधीचे सोन्यात रुपांतर झाले. राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसच्या पाठोपाठ सी-20 परिषदेच्या जागतिक स्तरावरील यशस्वी आयोजनामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. हे सर्व आयोजन नागपुरकरांसाठी संस्मरणीय ठरले असून येत्या काळात ते मोठ्या आयोजनांसाठी दिशादर्शक ठरेल .

– रितेश मोतीराम भुयार

  माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय, नागपूर 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जलसाठ्याचे प्रदूषणापासून संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य आवश्यक - रवींद्र ठाकरे

Fri Mar 24 , 2023
– जलजागृती सप्ताहाचा समारोप नागपूर :- प्रदूषणामुळे जलसाठातील पाणी दूषित होत असून नदीसह जलसाठे संरक्षित करणे ही काळाची गरज आहे. लोकसहभागाने जलसाठे संरक्षित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. जलसंपदा विभाग, भारतीय जलसंसाधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम बचत भवन येथे आयोजित करण्यात आला, त्यावेळी ठाकरे बोलत होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com