– राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त सायकल मॅरेथॉनचे आयोजन
नागपूर :- वाढत्या प्रदूषणा संदर्भात जनजागृती व्हावी याकरिता दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL), नागपूर महानगरपालिका, महामेट्रो आणि MYBYK यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.
वाढत प्रदूषणावर आळा बसविण्यासाठी आणि शहरात होणाऱ्या वाहतुकीची कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कमी अंतर गाठायचे असल्यास सायकल सारख्या उत्तम पर्यायच वापर करणे आवश्यक आहे. यामुळे प्रदूषणाची पातळी देखील कमी होऊ शकेल. हाच संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या सायकल मॅरेथॉनला शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी आपले शहर अधिक स्वच्छ साकारावे. उर्जा वाचवण्यासाठी, उत्सर्जन कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीकडे मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. यावेळी नागपूरचे सायकल मेयर डॉ. अमित समर्थ यांनी नागरिकांना सायकलच्या प्रवासाचे महत्व सांगितले. महा मेट्रो चे प्रमुख उदय बोरवणकर (कार्यकारी संचालक संचालन), आणि NSSCDCL आशिष मुकीम (स्वतंत्र संचालक) यांनी सायकल मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून सायकल स्वारांना सुरुवात केली.रवींद्र परांजपे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे विविध शालेय विद्यार्थी, शिक्षकानीं सायकलची स्वारी केली. सायकल मॅरेथॉनची सुरुवात फ्रीडम पार्क, झिरो माईलपासून झाली यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हाती पर्यावरण रक्षणाचे महत्वाचे संदेश आणि घोषणा दिल्या. याप्रसंगी स्मार्ट सिटी, नागपूर महानगरपालिका, आणि महामेट्रो अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.