रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकर राज्यात टॉपवर

नागपूर :- घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला द्यायची या ‘रूफ टॉप सोलर’, योजनेला नागपुरकर ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून महावितरणच्या कार्यक्षेत्रात राज्यभरातील एकूण 1 लाख 63 हजार 967 सोलर रुफ़ टॉप पैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात 28 हजार 335 ग्राहकांनी सोलर रूफ टॉप यंत्रणा बसवून पर्यावरणपुरक वीजनिर्मिती करीत वीजबिलातही भरघोस बचत सुरू केली आहे.

रूफ टॉफ सोलरची राज्यातील संख्या 1 लाख 63 हजार 969 इतकी असून त्यांची स्थापित क्षमता तब्बल दोन हजार 258 मेगावॉट आहे. त्यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील 28 हजार 335 रुफ़ टॉपचा समावेश असून त्यांची विद्युत निर्मिती स्थापित क्षमता 281 मेगावॉट आहे. राज्यातील एकूण सोलर रुफ़ टॉपच्या तुलनेत 17.28 टक्के सोलर रुफ़ टॉप एकट्या नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर परिमंडलाचा विचार करता वर्धा जिल्ह्यातील 37 मेगावॅट वीज निर्मितीची स्थापित क्षमता असलेल्या 3 हजार 245 रुफ़ टॉप ग्राहकासह परिमंडलातील एकूण 31 हजार 580 ग्राहकांनी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती सुरु केली असून त्यांची स्थापित वीज निर्मिती क्षमता 318 मेगावॉट आहे. राज्यातील एकूण सोलर रुफ़ टॉप मध्ये नागपूर परिमंडलातील नागपूर आणि वर्धा जिल्हा मिळीन एकूण वाटा 19.25 टक्के आहे.

आकडे बोलतात

सात वर्षांपूर्वी राज्यामध्ये केवळ 1 हजार 74 ग्राहकांकडून 20 मेगावॉट सौरऊर्जा रूफ टॉप पद्धतीने निर्माण होत होती, गेल्या सात वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या 1 लाख 63 हजार 969 इतकी झाली आहे, मागिल वर्षी ही संख्या 76 हजार 808 इतकी होती, यातून सौरऊर्जा निर्मितीची क्षमता एक हजार 860 मेगावॉट होती. चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2024 पासून आतापर्यतनागपूर परिमंडलातील तब्बल 5 हजार 376 ग्राहकांनी आपल्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा उभारली असून त्याची स्थापित क्षमता सुमारे 34 मेगावॉट इतकी आहे.

सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेमुळे ग्राहकाचा नेहमीपेक्षा कमी वीज वापर होतो, त्यामुळे वीजबिलात देखील कपात होते. याशिवाय ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली, तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीज बिल येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो.

योजनेच्या लाभासाठी

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला 78 हजार रुपये अनुदान मिळते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते, अशी ही योजना आहे.

या योजनेत नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर हे अत्याधुनिक संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.

सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. ग्राहकाच्या वीज आणि पैसे बचतीसोबतच पर्यावरण पुरक असलेल्या पंतप्रधान सुर्यघर- मुफ्त बिजली योजनेत सहभागी होऊन महावितरणच्या रुफ़ टॉप सोलरचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

Tue Jul 23 , 2024
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता ‘मार्वल’ कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!